खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी दुपारी १२ वाजता कोसळलेली दरड तब्बल ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हटविण्यात आयआरबीला यश आले. दरड हटविल्यानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत सुरू असली तरी दरड कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे. हा धोका लक्षात घेऊन महामार्गाचे सर्वेक्षण केले जाणार अहे. त्या सर्वेक्षणातून आढळून येणाऱ्या धोकादायक दरडी काढण्याचे काम दोन दिवसांत केले जाणार आहे.रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ असलेल्या आडोशी बोगद्यासमोर महाकाय दरड कोसळली होती. यामध्ये दोन प्रवासी ठार झाले होते, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व जुना राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला होता. सोमवारी दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. मात्र एक्स्प्रेस वेवरील दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. २२ जूनला खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली होती. महिनाभरात दरड कोसळण्याची दुसरी घटना घडल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या रस्त्याची पाहणी केली. धोकादायक दरडी हटविण्यासाठी सर्वेक्षण करून दरडी काढल्या जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी काही दिवस वाहतूक कोंडी व अन्य समस्यांचा सामना करावा लागणार आहे. विनय देशपांडे यांच्यासह अधीक्षक अभियंता ए. एस. आवटी व त्यांच्या पथकाने महामार्गाची पाहणी केली. यावेळी प्रांत राजेंद्र बोरकर, प्रभारी तहसीलदार उत्तम कुंभार व आयआरबीचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
धोकादायक दरडींवर उपाययोजना
By admin | Published: July 21, 2015 1:46 AM