पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गावर उपाययोजना; गटारांचेही काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:11 AM2019-06-01T01:11:03+5:302019-06-01T01:11:10+5:30
खारघर हिरानंदानी ते बेलापूर उड्डाणपूल येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. त्यामुळे पाणी साचून पावसाळ्यात अडचणी येत असत.
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचू नये, त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेतली आहे. पावसाळी नाले साफ करण्याबरोबरच ज्या ठिकाणी पावसाच्या निचरा होण्यासाठी जागा नाही. या ठिकाणी पदपथ खोदून मोरी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
पावसाळा आला पनवेल-सायन महामार्गावर जाणे-येणे खूपच जिकिरीचे बनत होते. सांगायचे झाले तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडत होते त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. खारघर ते बेलापूर हे अंतर कापण्यासाठी कधी कधी एक तास लागत होता. त्यावर उपाययोजना म्हणून ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडत होते, अशा पुलावर सिमेंट काँक्र ीटीकरण करण्यात आले आहे. याशिवाय पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला अडथळा येत होता. कित्येक वेळा वाहने बंद पडतात. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कळंबोली कॉलनी ते कामोठे बस स्टॉप या पर्यंत काँक्रीट गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच कोपरा या ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
खारघर हिरानंदानी ते बेलापूर उड्डाणपूल येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. त्यामुळे पाणी साचून पावसाळ्यात अडचणी येत असत. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पद खोदून महामार्गावरील पावसाचे पाणी बाजूच्या नाल्यामध्ये वाहून जावे याकरिता प्रत्येक दहा मीटर अंतरावर मोरी काढण्यात आल्या आहेत. त्या काँक्रीट करून त्याच्यावर पुन्हा अच्छादन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ, खारघर रेल्वेस्थानकासमोर काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते पूर्णत्वास येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी साचून रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, असा विश्वासही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.