नवी मुंबई : महापालिका रुग्णालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक १६ कोटी रुपये खर्चाचा ठेका बी.व्ही.जी. कंपनीला दिला आहे. या कामाची निविदा मंजूर करताना, कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. रुग्णालयांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीची साफसफाई झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठीचा ठेका १ जानेवारी २०१६ला बी.व्ही.जी. कंपनीला देण्यात आला. या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. साफसफाईचा ठेका देत असताना आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी मोठ्या प्रमाणात संबंधित ठेकेदाराशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. ठेकेदाराने सादर केलेल्या बिलांचे व्यवस्थित लेखा परीक्षण लेखा विभाग व लेखा परीक्षक विभागाकडून झालेले नाही. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आला, ती कंपनी कामासाठी पात्र नसल्याचा ठपका भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरिष्ठ सल्लागार यांनी अहवालात दिला होता. पालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदे यांनीही याबाबत प्रतिकूल शेरे लेखा परीक्षणामध्ये मारले होते; परंतु नंतर विभागाच्या जबाबदारीवर आक्षेप वगळण्यात आले. प्रशासनाच्या चुकांमुळे ठेकेदाराला ४२ टक्के अधिक लाभ झालेला आहे. साफसफाईसाठी ठेकेदाराने किती केमिकल पुरवायचे आहे, याविषयी स्पष्ट तरतूद आहे; परंतु आवश्यक तेवढे केमिकल पुरविण्यात आले नाही; परंतु रक्कम मात्र पूर्ण उचलली आहे. जून २०१६ ते जून २०१७ या एका वर्षामध्ये ठेकेदाराला १४ लाख ६२ हजार रुपये केमिकलसाठी देणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात ७० लाख १७ हजार रुपये दिले आहेत. ५५ लाख ५५ हजार जादा देण्यात आल्याचा आरोप केला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर तुकाराम मुंढे असताना त्यांनी २०१६ अखेरीस बी.व्ही.जी.च्या कामाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. त्यांना नोटीस देण्यात आली होती. २७ जानेवारी २०१७मध्ये सुनावणी घेण्यात आली. सुनावणीमध्ये एजन्सीचे काम असमाधानकारक असल्याचे दिसून आले. यामुळे एजन्सीचा ठेका रद्द करण्याचे आदेश मार्च २०१७मध्ये देण्यात आले. यानंतरही याच ठेकेदाराकडून काम करून घेतले जात असून त्यांना बिलेही देण्यात आलेली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.प्रशासनाने दिले आरोपांवर स्पष्टीकरणसाफसफाईच्या कामाविषयी केलेल्या आरोपांविषयी महापालिका प्रशासनाने सविस्तर खुलासा केला आहे. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालय, बेलापूर माता बाल रुग्णालयांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कंत्राटी कामाचा ठेका स्थायी समिती ठराव क्रमांक ७५, दिनांक ७ डिसेंबर २०१५ अन्वये पाच वर्षांसाठी बी.व्ही.जी. कंपनीला दिला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीचे कार्यादेश बी.व्ही.जी. कंपनीला देण्यात आले होते. यानंतर तपासणी केली असताना ठेकेदाराने निविदेमधील अटी-शर्तीचा भंग केला असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे तत्कालीन आयुक्तांनी नोटीस दिली होती. २७ जानेवारी २०१७मध्ये आयुक्तांनी सुनावणी घेतली व १५ मार्च २०१७मध्ये ठेका रद्द करण्याचे आदेश दिले. सदरचे काम अत्यावश्यक सेवेचा भाग असल्यामुळे व रुग्णालयीन सेवेवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी पुढील व्यवस्था होईपर्यंत काम सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून ते काम सुरू आहे. सदर आदेशाविरुद्ध बी.व्ही.जी. कंपनीने उच्च न्यायालयात २१ मार्च २०१७ रोजी याचिका दाखल केली असून, आर्बिटेटर नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे.३४५ पानांचे पुरावेयांत्रिक साफ-सफाईसाठी वार्षिक १६ कोटी रुपये खर्चाचा ठेका देण्यात आला. हा ठेका देताना व त्याची अंमलबजावणी करून घेताना भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडे याविषयी तक्रार करण्यात आली आहे.भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्यासाठी पुरावे जोडण्यात आले आहेत. तब्बल ३४५ पानांचे निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये पालिकेले दिलेली बिले वइतर सर्व कागदपत्रांचासमावेश आहे.मुंढेंनी ठेका रद्द केला होता१ जानेवारी २०१६मध्ये बी.व्ही.जी. इंडिया कंपनीला यांत्रिक साफसफाईचे काम देण्यात आले. वर्षाअखेरीस तत्कालीन आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी ठेकेदारास नोटीस दिली होती. सुनावणी घेऊन १५ मार्च २०१७मध्ये ठेका रद्द केला होता; परंतु त्यानंतरही त्याच ठेकेदाराकडून काम करून घेतले जात असून, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आरोग्य विभागाच्या कामावर घेतलेले आक्षेपअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरिष्ठ सल्लागारांनी बी.व्ही.जी. कामासाठी पात्र नसल्याचा अहवाल देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलेठेकेदाराला जादा दराने साफ-सफाईचे काम देण्यात आल्याने पालिकेचे नुकसानसाफसफाईसाठी पुरेसे केमिकल उपलब्ध करून दिले नसतानाही पूर्ण बिले देण्यात आली आहेतअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहवालापेक्षा जादा घसारा निधी देण्यात आला आहे.
यांत्रिक साफसफाईचा ठेका वादग्रस्त; पालिकेच्या तिजोरीची सफाई झाल्याचा गंभीर आरोप, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:12 AM