नवी मुंबई : महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई केली जात आहे, परंतु ठेकेदार काही ठिकाणी सफाई न करता मोकळे वाहन फिरवत असून, या निष्काळजीपणाकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.
नवी मुंबईमधील वादग्रस्त कामांमध्ये यांत्रिक साफसफाईचाही समावेश आहे. पामबीच रोड, ठाणे बेलापूर व इतर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई केली जाते. रोडच्या कडेला असणारा कचरा साफ करण्यासाठी हा ठेका देण्यात आला आहे, परंतु ठेकेदाराकडून या कामाकडे निष्काळजीपणा केला जात आहे. शुक्रवारी वाशीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर रस्ता साफ न करता, मोकळे वाहन चालविले जात होते. रोडपासून थोडे उंचीवर ब्रश ठेवण्यात आला होता.
रोडवरून जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. छायाचित्र काढल्यानंतर चालकाने ब्रश रोडवर फिरविण्यास सुरुवात केली.पामबीच रोडवर चालविण्यात येणाऱ्या वाहनामधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यामुळे प्रदूषणात भर पडत होती. महानगरपालिकेच्या वतीने या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाकडे अनेक वेळा दुर्लक्ष करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.