नवी मुंबई - महापालिका रुग्णालयामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या जात आहेत. काही ठेक्यांमध्ये चक्क डॉक्टरांचीच भागीदारी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोग्य विभागातील अनागोंदीवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी नगरसेवकांमधील नाराजी वाढत आहे. स्थायी समितीमध्येही त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पालिका रुग्णालयामध्ये सोनोग्राफी, एक्स-रे व इतर तपासण्या ठेकेदारांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. पालिकेने या सर्व सुविधा स्वत: उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या ठेक्यांमध्ये डॉक्टरांचीच भागीदारी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी या वेळी केला. पालिका रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. डायलेसिस मशिन बंद आहेत. सोनोग्राफी मशिनही बंदच आहेत. आरोग्य विभागातील डॉक्टर व अधिकारी जनतेसाठी नाही तर स्वत:साठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. पालिकेतील घाडगे यांच्याकडे तीन विभागांचा पदभार, तीन गाड्या व तीन स्वीय सहायक असून, असे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. मीरा पाटील यांनीही, आरोग्य विभागाकडून जनतेचे हित पाहिले जात नाही. डॉ. वैभव झुंझारे यांची आकसाने बदली केली आहे. मुख्यालयात १० ते १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाºयांच्या बदल्या का होत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले.राष्ट्रवादी काँगे्रसचे देविदास हांडे-पाटील यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र टीका केली. झुंझारे यांना मुद्दाम त्रास दिला जात असल्याचेही निदर्शनास आणून दिले. प्रशासन लोकप्रतिनिधींच्या भावनांना काहीही किंमत देत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका व्यक्तीला किती वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाणार, असा प्रश्नही उपस्थित केला.सभापती शुभांगी पाटील यांनीही प्रशासन पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप केला. १० ते १५ वर्षे एकाच ठिकाणी असणाºयांच्या बदल्या केल्या जात नाहीत. फक्त झुंझारेंची बदली का केली, असा जाबही सभापतींनी विचारला. नागरी आरोग्यकेंद्रापासून प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये औषधे नाहीत. नागरिकांना योग्य सुविधा मिळत नाहीत. वारंवार आवाजउठवूनही प्रशासन लक्ष देत नसल्याबद्दल सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अतिरिक्त आयुक्तही आक्रमकस्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. डॉ. झुंझारे यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. यावर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनीही आक्रमकपणे हा प्रशासकीय निर्णय असल्याचे स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असणाºयांच्या बदल्या केल्या जातील, असे स्पष्ट केले. प्रशासन सदस्यांच्या भावनांचा आदर करते व कोणतीही खोटी माहिती सभागृहाला दिली जात नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.सभापतींनीधरले धारेवरसभापती शुभांगी पाटील यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा नाही. डॉक्टर बाहेरून औषध आणायला सांगत आहेत. नगरसेवकांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
वैद्यकीय चाचण्यांच्या ठेक्यात डॉक्टरांची भागीदारी, स्थायी समितीमध्ये आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 6:46 AM