पनवेलमध्ये वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:33 AM2018-11-11T04:33:35+5:302018-11-11T04:34:31+5:30
रुग्णालयातील टाकाऊ कचरा अतिशय घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे देण्यात आली
कळंबोली : पनवेल परिसरात रुग्णालयातील वापरलेले बायोमेडिकल वेस्ट कचऱ्यात टाकले जात आहे. एका महिन्यात तीन प्रकार उघडकीस आले आहेत. कळंबोलीतील महात्मा गांधी रुग्णालयात कचºयात बायोमेडिकल वेस्ट आढळले असून, रुग्णालयाने आपली चूक लेखी स्वरूपात मान्य केली आहे.
रुग्णालयातील टाकाऊ कचरा अतिशय घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे देण्यात आली आहे. तळोजा येथे हा प्रकल्प असून, त्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावली जाते. सिडको वसाहत आणि पनवेल परिसरातील हे वेस्ट जमा करण्याकरिता दररोज वेस्ट मॅनेजमेंटची गाडी येते, याकरिता संबंधित रुग्णालयाकडून शुल्क आकारले जाते, त्यामुळे कित्येक क्लीनिक आणि रुग्णालयवाले हा कचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे न देता, कचºयात टाकतात. किंवा मोकळ्या जागेवर तो डम्प करून मोकळे होतात. शनिवारी आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी महात्मा गांधी रुग्णालयाचा कचरा तपासला असता, काही प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट आढळले. याबाबत त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला. नजरचुकीने कामगारांकडून हा प्रकार घडला आहे, यापुढे अशी चूक होणार नाही, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. मागील आठवड्यात गांधी रुग्णालयाजवळ अशा प्रकारे वैद्यकीय कचरा सर्वसाधारण कचºयात टाकण्यात आला होता. खांदा वसाहतीत भालेकर लॅबजवळही असा प्रकार माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिला.
याअगोदर कामोठे वसाहतीत मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणाºया रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर अशा प्रकारचा कचरा आढळला होता. त्यानंतर खांदा वसाहतीत सेक्टर -९ मध्ये शिवाजी चौकात पदपथावर बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात येत असल्याचे महादेव वाघमारे यांनी उघडकीस आणले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्वसाधारण कचºयासोबत दवाखान्यातील हे वेस्ट टाकण्यात येत असल्याने अनेकदा सफाई तसेच घंटागाडी कामगारांच्या हातात सुया घुसल्याचे प्रकारही घडले आहेत. तरीसुद्धा संबंधित रुग्णालयांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, अशी खंत शिवसेनेचे महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केली आहे.
रुग्णालयांकडून नियमांची पायमल्ली : सुईसह सलाइन बाटल्याही टाकल्या जातात कचराकुंडीत
महापालिकेची करडी नजर
बायोमेडिकल वेस्ट हे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे देणे बंधनकारक आहे. मात्र, काही जण सर्वसाधारण कचºयात टाकतात. याअगोदर सिडको आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कारवाई केली नाही. त्याचबरोबर या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यामागे काय झाले त्या बाबत आम्ही काही बोलू शकत नाही; परंतु गेल्या महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन आमच्याकडे आले तेव्हापासून असे प्रकार होऊ नये, म्हणून आमचे पर्यवेक्षक लक्ष ठेवून आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचे तसे आम्हाला आदेशच असल्याचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी सांगितले.