मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली. आधीच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना आता नव्याने उभ्या होत असलेल्या बेकायदा बांधकामांना सुटीचे संरक्षण मिळाले आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस दिवाळीची सुटी होती. त्याला लागूनच दुसरा सुटीचा शनिवार आणि रविवार आल्याने सलग सहा दिवस सुटीचा आनंद मिळाला. याशिवाय, बरेच अधिकारी-कर्मचारी सोमवारची रजा घेऊन रविवारपासूनच सुटीवर गेले होते. त्यामुळे सोमवारी पालिकेत शुकशुकाटच होता. गेला आठवडाभर पालिकेमध्ये दिवाळी सुटीचे वातावरण असले, तरी शहरात मात्र बेकायदा बांधकाम करणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत. सलग सुट्या असल्याने पालिकेची कार्यालये बंद, तर अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याने शहरातील झोपडपट्ट्या, औद्योगिक वसाहतींमध्ये गाळे वाढवण्याची बेकायदा बांधकामे सर्रास चालली आहेत. गाळे, चाळी, झोपड्या, खोल्या आदींपासून मोठी बांधकामेसुद्धा सर्रास बांधली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुटीच्या दिवशी बांधकामे चालवल्याने पालिका अधिकाºयांनीदेखील त्याकडे कानाडोळा केला. शिवाय, जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्याच, तरी सुटीचे कारण पुढे करत कामावर हजर झाल्यावर बघू, असे उत्तर त्यांना देण्यात आले. अनधिकृत बांधकामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह कथित समाजसेवकांपासून अनेकांचे हात ओले होत असतात. अनधिकृत बांधकामांप्रकरणी लाच घेताना अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी रंगेहाथ पकडले गेले आहेत. यावरून त्यांचे लागेबांधे स्पष्ट होतात. त्यामुळे बेकायदा बांधकामे करताना अनेकांना सांभाळून घेतले जाते. त्यामुळेच बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई होत नाही. शिवाय, याला जबाबदार असणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी मोकाटच असतात. अनधिकृत बांधकामांविरोधात काही लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली होती. अनेकजण तक्रारीसुद्धा करतात. पण, शहरात बेकायदा बांधकामे करण्यात भागीदारी मागण्यापासून फुटाप्रमाणे आकडेमोड केली जाते. त्यामुळे राजाश्रय लाभलेल्या या बांधकामांवर कारवाईची हिम्मत पालिका अधिकारीच काय, तर आयुक्तदेखील करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.पालिका प्रशासन सत्ताधाºयांसमोर लाचार झाले आहे. गल्लीबोळांंमध्ये फोफावलेल्या बड्या राजकीय धेंडांच्या बांधकामांना का तोडले जात नाही, याचा लेखी खुलासा पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रकरणनिहाय करावा. अनधिकृत बांधकामांना पालिकेचा आशीर्वाद आहे. अनधिकृ त बांधकामांवर प्रभाग अधिकारी कारवाई करत नसतील, तर प्रशासनही त्यांना निलंबित करून फौजदारी दावा दाखल करत नाही, हे दुर्दैव आहे.- अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनसे