मीरा पाटील आणि शकुंतला चिरलेकर ठरल्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:36 PM2023-05-31T16:36:47+5:302023-05-31T16:37:33+5:30
चिरनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी ( ३०) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी ( ३०) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील यांनी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती मनोगतातून दिली. या निमित्त शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी समाजासाठी झटणाऱ्या महिलांचे कार्य व त्यांची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीने मागविली होती. त्यानुसार गावातील सहा महिलांचे अर्ज दाखल झाले होते. यामधून निवड समितीने महिलांच्या कार्य कौशल्याचा विचार करून, दोन महिलांची निवड केली. यात मीरा वसंत पाटील व शकुंतला देविदास चिरलेकर या दोन महिला अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांना उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रियांका गोंधळी यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी माजी सरपंच मंदा ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य शितल घबाडी, ग्रामपंचायत सदस्य किशोर भगत, ग्रामपंचायत सदस्य रमेश पोफेर कर , शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, तलाठी के. डी. मोहिते, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील ,सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मोकल ,काँग्रेसचे चिरनेर गाव माजी अध्यक्ष सचिन घबाडी,प्रशांत म्हात्रे, शोभा ठाकूर, उर्मिला ठाकूर ,अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.