टंचाईवर मात करण्यासाठी पाणी परिषद भरवा
By admin | Published: November 30, 2015 02:27 AM2015-11-30T02:27:19+5:302015-11-30T02:27:19+5:30
पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे
पनवेल : पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. पनवेल नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल. यासाठी पाणी परिषद भरविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पनवेल शहर अध्यक्ष तसेच नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल नगरपरिषदेकडे केली आहे.
यंदा पाऊस कमी झाला असून साधारण फेब्रुवारीपासून पनवेल शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी वितरणाबाबत आतापासून जर योग्य नियोजन झाले नाही तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पनवेल शहराला सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी व देहरंग धरणातून पाणीपुरवठा होत आहे. एमजेपीनेही काही दिवसांपूर्वी पाणी जपून वापरण्याची सूचना नागरिकांना दिली आहे. (प्रतिनिधी)भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईसंदर्भात पालिका गंभीर आहे. पाणी परिषदेचा विषय अजेंड्यावर असून लवकरच पाणी परिषद बोलावण्यात येणार आहे. - चारु शीला घरत, नगराध्यक्ष, पनवेल