नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड १९ विशेष रुग्णालयाच्या कामाची पाहणी नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या वेळी नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील कोविड रुग्णांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने ११८२ बेड्सची क्षमता असणारे व त्यातही ५०० बेड्स आॅक्सिजन सपोर्टची व्यवस्था असणारे रुग्णालय महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असून पालकमंत्री शिंदे यांनी शनिवारी ६ जून रोजी या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. विविध सूचनांसाठी या वेळी नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठकदेखील आयोजित केली होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी वाशी सिडको प्रदर्शन केंद्र येथील विशेष कोविड रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत रुजू होणार होणार असल्याची माहिती दिली. पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती पालकमंत्री शिंदे यांना दिली. आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन नॉन कोविड रुग्णांसाठीही नेरूळच्या डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात १२०० बेड्स उपलब्ध असून तेथे महापालिकेच्या खर्चाने नागरिकांवर उपचार करण्यात येणार आहेत. पावसाळी कालावधीत प्रत्येक रुग्णाला आवश्यक उपचार मिळालेच पाहिजेत याकरिता पालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांशी संपर्क साधून त्यांना निर्देश द्यावेत, असेही शिंदे यांनी सांगितले.च्वाशी सिडको प्रदर्शन केंद्र येथील विशेष कोविड रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत रुजू होणार आहे. त्याची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.