नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील काळ जलविद्युत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोकणभवनमध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे प्रगतिपथावर असून प्रकल्पग्रस्तांना सर्व कायदेशीर लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार भरत गोगावले, पुनर्वसन उपआयुक्त अरूण अभंग, उपविभागीय अधिकारी महाड, माणगाव, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता काळ प्रकल्प यांच्यासह प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे सदस्य उपस्थित होते. पुनर्वसन समिती सदस्यांसह गोगावले यांनी प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली. सांडोशी, निजामपूरसह तीनही पुनर्वसित गावांसाठी वाढीव आवार, गावठाणातील सर्व १८ प्रमुख सुविधा सर्वप्रथम देण्याची मागणी केली. प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला दिला गेला पाहिजे. जवळपास १२०० पेक्षा जास्त कुटुंबांचे पूर्ण पुनर्वसन झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणीसाठीचा आग्रह धरण्यात आला. कोकण आयुक्तांनी आमदार गोगावले व जलविद्युत प्रकल्प पुनर्वसन समितीच्या सदस्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेवून त्या सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना पुनर्वसनाच्या सर्व सुविधा देण्यात येतील. पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे प्रगतिपथावर असून प्रकल्पग्रस्तांना त्यांचे सर्व कायदेशीर लाभ दिले जातील असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘काळ’ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी बैठक
By admin | Published: April 20, 2017 3:39 AM