नवी मुंबई : पामबीच रस्त्याला लागून होणाऱ्या गोल्फकोर्समुळे पाणथळ जमीन नष्ट होणार असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी लढा सुरू केला आहे. या लढ्याची दखल घेऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. पर्यावरणाचा ºहास रोखण्याच्या सूचना सिडको प्रशासनाला केल्या असून, गोल्फकोर्सऐवजी फ्लेमिंगो अभयारण्यासाठी राखीव ठेवता येईल का? यावरही चर्चा झाली.सिडकोने एनआरआय फेज-२ ते टी. एस. चाणक्य दरम्यानची ३३ एकर जमीन गोल्फकोर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीवर १८ होलचा गोल्फकोर्स व उर्वरित जमिनीवर गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे पाणथळ जमिनीचा ºहास होणार असल्याची तक्रार सेव्ह नवी मुंबई एन्व्हायरमेंट संस्थेच्या सदस्यांनी केली आहे. सुनील आगरवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनस्तरावर व न्यायालयातही पाठपुरावा सुरू केला आहे. यानंतरही येथील जमिनीवरील वृक्ष कापण्यासाठी सिडकोने परवानगी दिली आहे. विकासकाने या भूखंडावरील वृक्ष कापल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करून याविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी २७ जानेवारीला बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, नितीन करीर व सेव्ह नवी मुंबई एन्व्हायरमेंट या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.पर्यावरणमंत्र्यांनी या बैठकीमध्ये गोल्फकोर्समुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुनील आगरवाल यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, गोल्फकोर्सऐवजी हा परिसर फ्लेमिंगो अभयारण्यासाठी राखीव ठेवण्याच्या विषयावरही चर्चा झाली. पर्यावरणमंत्र्यांनीही यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये पाणथळ जमीन नष्ट होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या परिसरामध्ये भविष्यामध्येही पर्यावरणाला हानी होऊ नये, यासाठी संरक्षण कुंपण घालण्यात यावे. गोल्फकोर्सऐवजी काय करता येईल, याविषयी आठ दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही आगरवाल यांनी सांगितले.
पामबीचलगत गोल्फकोर्सच्या जागेसाठी पर्यावरणमंत्र्यांकडे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:26 AM