नवी मुंबई : शहरातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विकासक व वास्तुविशारदांची बैठक आयोजीत करून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकामांमुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
नवी मुंबईमध्येही हवा प्रदुषणामध्ये वाढ होत आहे. धुळीकणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. बांधकाम व्यावसायीक व वास्तुविशारद यांनी एकत्र येऊन शहराचा विकास करताना शहराच्या हवा गुणवत्ता प्रमाणकाचीही काळजी घ्यावी. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बांधकाम साईट्सवरून पुढील आदेश होईपर्यंत डेब्रिजची वाहतूक होणार नाही याची काटेकोर पालन करावे असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. साईटवर बांधकाम साहित्य आणणे अत्यंत गरजेचे असेल तेव्हा ते वाहन पूर्णत: झाकलेले असेल याचीही काळजी घ्यावी. खासगी बांधकाम व्यावसायीकांनी हवा प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बांधकामाच्या ठिकाणी धूळ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्प्रिंकलरच्या माध्यमातून फवारणी करावी अशा सूचनाही दिल्या. यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह शहर अभियंता संजय देसाई, सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, वसंत बद्रा, संतोष सतपथी, शेखर बागुल, हितेन जैन, केतन त्रिवेदी, अनिल पटेल, कौशल जाडिया व इतर उपस्थित होते.