प्रस्तावित महापालिकेच्या अभ्यास समितीची बैठक रद्द
By admin | Published: April 13, 2016 12:23 AM2016-04-13T00:23:36+5:302016-04-13T00:28:15+5:30
प्रस्तावित पनवेल महापालिकेचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीची ११ एप्रिलची नियोजित बैठक होवू शकली नाही. ३0 एप्रिलपर्यंत पनवेल महापालिकेची
नवी मुंबई: प्रस्तावित पनवेल महापालिकेचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीची ११ एप्रिलची नियोजित बैठक होवू शकली नाही. ३0 एप्रिलपर्यंत पनवेल महापालिकेची अधिकृत स्थापना करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. परंतु अंतिम बैठकच रद्द झाल्याने हा मुहूर्त टळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रस्तावित महानगरपालिकेत पनवेल तालुक्यातील १७३ पैकी ६६ गावे, आठ सिडको वसाहती व पनवेल शहराचा समावेश करण्यात येणार आहे.
नव्या महापालिकेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका पार पडल्या आहेत.
अभ्यास समितीने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. सोमवारच्या बैठकीनंतर ही समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार होती. परंतु आता ही बैठकच रद्द झाल्याने पुढील बैठक केव्हा होते, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)