नवी मुंबई : सीबीडीमधील गौरव या निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आमदार मंदा म्हात्रे यांच्या दिवसाची सुरुवात झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व्यापाऱ्यांची बैठक, मार्केटमधील विविध घटकांशी संवाद, माथाडी कामगार संघटनेची पत्रकार परिषद व नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमधील खारघर येथील सभा, असा पूर्णपणे धावपळीमध्ये दिनक्रम पार पडला. दिवसभर कार्यकर्त्यांचा व नागरिकांनी केलेला प्रत्येक फोन स्वत: घेऊन मतदारसंघातील घडामोडींचा व प्रचाराचा आढावा घेणे सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.
निवडणूक काळात प्रत्येक दिवस व क्षण महत्त्वाचा असतो. उमेदवारांना सदैव दक्ष राहावे लागते. बेलापूरच्या भाजप उमेदवार आमदार मंदा म्हात्रे यांचा दिवसही सकाळी लवकर सुरू झाला. दिवसभर मतदारसंघामध्ये कोण कुठे प्रचार करणार आहे. मतदारांची यादी व दिवसभरातील प्रचाराविषयी सर्वांना प्रत्यक्ष व फोनवरून सूचना करून १० वाजता बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या व्यापाºयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. पाच वर्षांमध्ये विस्तारित भाजी मार्केटचा प्रश्न सोडविता आल्याविषयी समाधान व्यक्त केले. भविष्यात बाजार समिती हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट बनविण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षातील उमेदवाराच्या धोरणांचा सडकून समाचार घेतला. मराठी कार्ड वापरण्याचा प्रयत्न करणारे स्वत: ओबीसी असल्याचे सांगून महापालिकेची निवडणूक लढल्याची टीकाही केली. पश्चिम महाराष्ट्रासह व देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य यापूर्वी दिल्याचे सांगितले. व्यापाºयांशी संवाद साधून ११.३० वाजता माथाडी संघटनेच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती दर्शवून कामगारांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. माथाडी कायदा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
एपीएमसीमधील व्यापारी, संघटनांचे प्रतिनिधी, माथाडी भवनमध्ये विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मंदा म्हात्रे महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह दुपारी पुन्हा गौरव या निवासस्थानाकडे रवाना झाल्या. मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराविषयी माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या, कोणीही गाफील राहू नये. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीवर राहून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देऊन खारघरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीसाठी कार्यकर्त्यांसह रवाना झाले. पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर पुन्हा विभागनिहाय नागरिकांशी संवाद सुरू झाला. मतदारसंघामधील एनआरआय, अक्षर या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधला.प्रत्येक फोनला स्वत:च प्रतिसादआमदार मंदा म्हात्रे या कार्यकर्ते व सामान्य नागरिक कोणीही संपर्क साधला तरी स्वत:च फोन उचलत असतात. पहाटेपासून ते प्रचार संपेपर्यंत फोन सुरूच होता. सभेत भाषण करताना व नागरिकांशी संवाद साधताना जे फोन उचलता आले नाहीत त्या सर्वांना गाडीतून प्रवास करताना स्वत: फोन करून संवाद साधत होत्या. नागरिकांना थेट संपर्क साधता यावा, यासाठी प्रत्येक फोन नेहमीच स्वत:च उचलत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.