उरण-जेएनपीटीतील वाहतूककोंडीप्रकरणी बैठक, श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:42 AM2020-01-25T02:42:55+5:302020-01-25T02:43:24+5:30
उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
उरण : उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्ते-उड्डाणपूल, कॉरिडोरच्या कामास होत असलेला विलंब, अनधिकृत कंटेनर यार्ड, बेशिस्त वाहतूक, वाढती रहदारी अशा अनेक कारणांमुळे परिसरात वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून उपाययोजनांबाबत होत असलेल्या विलंबाबाबत जाब विचारला. जेएनपीटी आणि गव्हाणफाटा-चिरनेर महामार्गावरील वाहतूककोंडीची काळजी घेण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही बारणे यांनी या वेळी दिल्या.
जेएनपीटी-उरण परिसरातील विविध महामार्गावर नियमित वाहतूककोंडी होत असल्याने चालकांसह नागरिक, प्रवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीवरून जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी, जेएनपीटी प्रशासन भवनात बैठक बोलावली होती. बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत नवी मुंबई वाहतूक नियंत्रक शाखेचे डीसीपी सुनील लोखंडे, एसीपी राजेंद्र चव्हाण, उरण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे, जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे, मनीषा जाधव, एनएचआय अध्यक्ष प्रशांत फेगडे, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख तथा जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, विविध बंदरांचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
अनधिकृत कंटेनर गोदामांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने बहुतांशी अवजड वाहने महामार्गालगत उभी केली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होत असून सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याची कैफियत स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडली. या अनधिकृत कंटेनर गोदामांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. वाहतूक पोलिसांना कर्मचारी कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवून देण्याची मागणी व करळफाटा महामार्गावर २४ तास रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी केली. यावर जेएनपीटी कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी, जेएनपीटीतील तीन टर्मिनलने प्रत्येकी २० प्रमाणे ६० सुरक्षारक्षक वाहतूक पोलिसांच्या मदतीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यात चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरील वाहनांना जेएनपीटी महमार्गावर जाण्याचा मार्ग गव्हाणफाटा येथून काढावा, त्यामुळे मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्याला मदत होईल, अशी मागणीही त्यांनी केली. यावर उत्तर देताना वनविभागाच्या अडचणींमुळे हे काम थांबले आहे. मात्र, हे काम एनएचआय अधिकाºयांनी पूर्ण करून देण्याचे मान्य केले. गोदामांचा सर्व्हे करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली.
जेएनपीटी महामार्गावरील पथदिवे बंद असून ते चालू करावेत, असे न्हावाशेवा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी सुचविले. परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे, अशी सूचना बारणे यांनी अधिकाºयांना केली. एक महिन्यांनी यावर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वाहतूक सुरक्षेअभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत तोडण्यात आलेल्या जुन्या इमारतींचे डेब्रिजही उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आणले जात आहेत. रात्रीच्या वेळी १५० ते २०० डम्परमधून डेब्रिज आणले जात असल्याने वाहतूककोंडी होते. त्यावरही तत्काळ कारवाई करण्याची मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली.