पनवेल : एलबीटीबाबत शहरातील व्यापाऱ्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी पनवेल महापालिकेने बैठक बोलावली होती. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कार्यकर्त्यांनी राडा करीत बैठक उधळून लावली. त्यामुळे मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर पनवेलच्या पालिका आयुक्तांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पनवेलमध्ये एलबीटीमुळे सध्या गदारोळ सुरू आहे. महागाई, महापालिका दर्जाच्या सोई-सुविधांचा अभाव व येऊ घातलेली जीएसटी करप्रणालीमुळे व्यापारीवर्गात असंतोष आहे. शिवसेनेने सुरुवातीपासूनच वाचा फोडली होती. मंगळवारी एलबीटी राबवण्याकरिता आवश्यक मार्गदर्शनासाठी महापालिकेच्या वतीने आद्य क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी माहिती देण्यासाठी आले होते. बैठक सुरू असताना शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली ७० ते ८० कार्यकर्त्यांनी धडक देत एलबीटीविरोधात घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर व्यापाऱ्यांनीही आपला विरोध दर्शवला. (वार्ताहर)
महापालिकेची बैठक सेनेने उधळली
By admin | Published: January 11, 2017 6:32 AM