पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या शहरात सभा

By admin | Published: February 13, 2017 05:14 AM2017-02-13T05:14:37+5:302017-02-13T05:14:37+5:30

राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच त्याचे लोन नवी मुंबईकडे फिरले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा

Meetings of candidates of western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या शहरात सभा

पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या शहरात सभा

Next

सूर्यकांत वाघमारे / नवीमुंबई
राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच त्याचे लोन नवी मुंबईकडे फिरले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा नवी मुंबईत होत असून, त्यामधून मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत.
राज्यात सध्या १० मनपा, २५ जिल्हा परिषदा व २९६ पंचायत समितींच्या निवडणुकीची रंगत सुरू आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा नवी मुंबईतही होऊ लागल्या आहेत. रविवारी कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर काँग्रेसच्या वतीने कोपरखैरणेतच कराड दक्षिण जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही सभांना पश्चिम महाराष्ट्रातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोकरीनिमित्ताने मुंबईसह नवी मुंबईत राहणाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या जास्त असून, त्यापैकी बहुतांश माथाडी कामगार आहेत. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे आदी ठिकाणी निवडणुका असल्यास शहराकडचा हा मतदार ‘राजा’ झालेला असतो. त्यांचे मत पदरात पाडून घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बैठका व सभांचे आयोजन केले जाते. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण व विलासकाका हुंडाळकर यांच्यातल्या विधानसभेच्या लढतेच्या प्रचारसभाही नवी मुंबईत झालेल्या आहेत. त्यावरून पश्चिम महाराष्ट्रात निवडणूक असल्यास नवी मुंबईत विशेष करून कोपरखैरणेत प्रचारसभा घेणे हा पायंडाच पडलेला आहे. अशा सभांकरिता प्रभाव पडेल, अशा नेतृत्वाला बोलावून मतदारांची बांधणी करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही नवी मुंबईत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभा रंगण्याला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली येथील मध्यमवर्गीय कुटुंबावर विषेश लक्ष केंद्रित केले जात आहे. अनेकांची शहरात व गावाकडे अशी दुहेरी मतदार नोंदणी आहे. त्यापैकी बहुतांश जण दोन्हीकडे मतदानाचा हक्क बजावत असतात. यामुळे विधानसभा निवडणूक काळात नवी मुंबईत मतदान केल्यानंतर खासगी बस भरून गावाकडे जात असतात. यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी दुहेरी मतदानासंदर्भात एपीएमसी मध्ये केलेले वक्तव्य वादग्रस्तही ठरले होते. यामुळे राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत होणाऱ्या राजकीय सभांकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नुकतेच वाईतील एका उमेदवारासंदर्भात झालेल्या प्रचार सभेनंतर उपस्थित मतदारांची विशेष ठिकाणी खानावळीची सोय करण्यात आली होती. त्या ठिकाणी कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने भेट स्वरूपात टिफीनचे वाटप केल्याचे दिसून आले. एकाच वेळी हे दोन्ही कार्यक्रम झाल्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Web Title: Meetings of candidates of western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.