नवी मुंबई : सिडकोने जाहीर केलेल्या गृहप्रकल्पातील घरांना पहिल्या काही दिवसांत विक्रमी प्रतिसाद मिळाला. मात्र, मागील आठ दिवसांपासून घरांच्या नोंदणीची गती अचानक थंडावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सिडकोचा संबंधित विभाग चक्रावून गेला आहे. नोंदणीची गती थंडावण्यामागे काही तांत्रिक अडचणी आहेत का, याचा शोध सिडकोच्या माध्यमातून घेतला जात आहे.
सिडकोने अल्प आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी १४,८३८ घरांचा मेगा गृहप्रकल्प जाहीर केला आहे. १३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, तर १५ आॅगस्टपासून घरांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणी प्रक्रियेला पहिल्याच दिवशी २२१७ ग्राहकांनी प्रतिसाद देत आपले अर्ज सादर केले. पुढील आठ दिवसांत म्हणजेच २३ आॅगस्टपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या २३,३९६ इतकी होती. त्यापैकी १६,९६२ अर्जदारांनी आॅनलाइन शुल्कही अदा केले आहे. मात्र, त्यानंतर अर्ज दाखल होण्याची गती मंदावल्याचे दिसून आले आहे. पहिल्या तीन दिवसांतील दाखल अर्जाची सरासरी पाहता मागील पंधरा दिवसांत अर्जांचा आकडा लाखाच्या घरात जाण्याचा अंदाज सिडकोकडून व्यक्त केला जात होता. मात्र, दिवसेंदिवस ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी होत असल्याचे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे सिडकोने तीन वर्षांपूर्वी स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पाची घोषणा केली होती. यात केवळ १३00 घरे होती. असे असतानाही सुमारे ७0 हजार ग्राहकांनी अर्ज घेतले होते. यावेळी जवळपास पंधरा हजार घरे आहेत. असे असतानाही ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. उपलब्ध आकडेवारीवरून मागील पंधरा दिवसांत सुमारे ६९,९२६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी फक्त ३५,२२७ अर्ज पात्र ठरले आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी जवळपास ५0 टक्के अर्जच पात्र ठरल्याचे दिसून आले आहे.१६ सप्टेंबरपर्यंतची मुदतघरांसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. कारण सिडकोच्या संकेतस्थळावरील घर नोंदणीच्या पोर्टलला मागील पंधरा दिवसांत जवळपास दीड लाख ग्राहकांनी भेट दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबरपर्यंत असल्याने अर्जाचा आकडा नक्कीच वाढेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.