लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलवर यार्ड फिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ३० जून ते ३० जुलैदरम्यान एक महिन्याचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत सीमित राहणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. तिरुवनंतपूरम सेंट्रल लोकमान्य टिळक टर्मिनल (१६३४६) या नेत्रावती एक्स्प्रेसचा दैनंदिन प्रवास ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकावर समाप्त होणार आहे.
त्यामुळे या गाडीचा पनवेल ते लोकमान्य टिळक टर्मिनल दरम्यानचा प्रवास रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दररोज धावणाऱ्या मंगलुरू सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनल (१२६२०) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास पनवेलस्थानकावर समाप्त केला जाणार आहे. त्याचप्रमाणे या दोन गाड्यांचा परतीचा प्रवास पनवेल स्थानकांतून सुरू होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल- तिरुवनंतपूरम सेंट्रल (१६३४५) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनलऐवजी पनवेल स्थानकातून सुरू होईल. १ ते ३० जुलै या कालावधीत दरदिवशी दुपारी १२:५० वाजता ही गाडी पनवेल स्थानकातून रवाना होईल. तर लोकमान्य टिळक टर्मिनल- मंगळुरू सेंट्रल (१२६१९) मत्स्यगंधा एक्स्प्रेस दररोज सांयकाळी ४:२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.