कोकण रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक; दोन गाड्यांच्या वेळेत बदल, रेल्वे प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती
By कमलाकर कांबळे | Published: February 26, 2024 12:40 AM2024-02-26T00:40:35+5:302024-02-26T00:40:57+5:30
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी करंजाडी - चिपळूण विभागादरम्यान मंगळवारी कोकण रेल्वेने अडीच तासाचा मेगाब्लॉक जाहिर केला आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या दोन यनियमित गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून विविध मार्गावर आवश्यकतेप्रमाणे मेगाब्लॉक घेवून मालमत्तेच्या देखभाल, दुरूस्तीची कामे केली जातात. त्यानुसार करंजाडी-चिपळूण विभागामधील मालमत्तेच्या देखभाल दुरूस्तीसाठी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२: ४० ते ३: १० या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोईम्बतूर ते जबलपूर (०२१९७) या गाडीचा २६ फेब्रुवारीला सुरू होणारा प्रवास रत्नागिरी-कामठे विभागादरम्यान एक तासासाठी स्थगीत केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड-दिवा (१०१०६) एक्स्प्रेसचा २७ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी-रत्नागिरी विभागादरम्यान ७० मिनिटांसाठी थांबविला जाईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.