पनवेलमध्ये साकारतेय मेगाकिचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:29 AM2020-02-16T02:29:44+5:302020-02-16T02:29:54+5:30
संडे अँकर । दहा हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी मिळणार आहार
वैभव गायकर
पनवेल : महानगरपालिका व अक्षयपात्र फाउंडेशनच्या संयुक्त सहकार्यातून शहरातील साईनगर परिसरात मेगाकिचन उभारणीचे काम सुरू आहे. सुमारे दोन हजार चौरस फूट जागेत तळमजला अधिक तीन मजले, अशा भव्य क्षेत्रात हे मेगाकिचन आकार घेत आहे. या माध्यमातून दररोज दहा हजार विद्यार्थ्यांना पुरेल एवढा पोषक आहार या ठिकाणी तयार केला जाणार आहे. अक्षयपात्र संस्था महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पोषक आहाराचे वाटप करणार आहेत.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योनजेनेमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पनवेलसह नवीन मुंबई व कोल्हापूर महानगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या मेगाकिचनचे काम जोरात सुरू आहे. या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च अक्षयपात्र फाउंडेशन ही संस्था उचलणार आहे, याकरिता पालिकेने या संस्थेकडून प्रतिवर्ष नाममात्र भाडे आकारून हे भूखंड दिले आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याच्या प्रधान सचिवांचे आयुक्तांना पत्र आले होते. त्यानुसार १९ नोव्हेंबर २०१८ रोजी पालिकेच्या महासभेत ठराव करून तो अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या प्रधानसचिवांना पाठविला होता. ४ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका व अक्षयपात्र फाउंडेशन यांच्यामध्ये ३० वर्षांचा करार झाला आहे. सध्याच्या घडीला पनवेल महानगरपालिकेच्या दहा शाळा यांची पटसंख्या १,८९६ च्या घरात आहे. तर पालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांची पटसंख्या ८,६९४ इतकी आहे. ही पटसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमावली २०१५ अंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अक्षयपात्र संस्थेने पुढाकार घेतला आहे. पालिकेला कोणताही खर्च येणार नाही. देशभरात अक्षयपात्र संस्थेचे अशाच प्रकारे एकूण ५२ ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. पनवेल शहरातील साईनगरमधील तीन मजली इमारतीत मध्यान्ह पोषण आहार बनविण्याचे काम चालणार आहे. तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षीच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातही होईल, अशी आशा आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
अक्षयपात्र या संस्थेच्या पुढाकाराने पालिका क्षेत्रातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत मध्यान्ह प्राप्त होणार आहे, याकरिता पालिकेला कोणताही अतिरिक्त खर्च होणार नसून पनवेल शहरात सुरू असलेले मेगाकिचन उभारणीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महानगरपालिका