नेरुळमध्ये साकारणार स्मृतिवन; महापालिकेचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:15 AM2019-06-06T01:15:07+5:302019-06-06T01:15:15+5:30
आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
नवी मुंबई : महापालिकेने नेरुळ सेक्टर २६ मध्ये २२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्मृतिवन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या प्रियजनांच्या स्मृती जपता येणार असून, वृक्षांवर त्यांचे नामफलक लावले जाणार आहेत. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी नावनोंदणी केली आहे.
स्मृतिवन संकल्पनेत नागरिक एक हजार रुपये नाममात्र शुल्क भरून वृक्ष लागवडीद्वारे प्रियजनांच्या नावाने आठवणी जपू शकतात. संबंधित व्यक्ती व संस्थेचा नामफलक त्या वृक्षावर लावण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी खड्डा खोदणे, त्याकरिता लागणारी लाल माती, शेणखत व नामफलक बसवून तीन वर्षांपर्यंत त्या वृक्षाची जोपासना केली जाणार आहे.
आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. महापालिका स्मृतिवनमध्ये बेल, कैलासपती, चिंच, कवठ, बकुळ, बहावा, पांगारा, लिंब, आकाश निंब, पारिजातक, चंदन, सीताअशोक, अर्जुन, समुद्रफळ अशा देशी वृक्षांची लावगड करणार आहे.
नेरुळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरातील स्मृतिवनच्या कामाची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी पाहणी केली. त्या ठिकाणी ड्रीप व स्प्रिंकलरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्मृतिवनच्या उर्वरित भागाचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी वृक्षलावगड करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नितीन काळे, अजय संख्ये, पंढरीनाथ चौडे, प्रकाश गिरी, पूनम चासकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.