‘मेमू’ सेवेला दुहेरी मार्गाचा अडसर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 02:22 AM2016-06-20T02:22:16+5:302016-06-20T02:22:16+5:30
पुणे गाठण्यासाठी आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवासीयांची गैरसोय थांबविण्यासाठी मार्च २0१४ पर्यंत एलटीटी-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करीत होते
विजय मांडे, कर्जत
पुणे गाठण्यासाठी आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवासीयांची गैरसोय थांबविण्यासाठी मार्च २0१४ पर्यंत एलटीटी-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करीत होते. ही सेवा सुरू झाल्यास हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांना दिलासा मिळणार होता. परंतु पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग झाल्याशिवाय हा मेमूचा (मेनलाइन इलेक्ट्रॉनिक मल्टीपल युनिट) प्रकल्प पुढे सरकणार नाही, असे त्यावेळेचे मध्य रेल्वे व्यवस्थापकांनी स्पष्ट केले होते.
सध्या काही एक्स्प्रेस गाड्यांसह लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्याही या मार्गावरून दररोज जातात मग मेमू सेवा का धावणार नाही, असा संतप्त सवाल कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी पंकज मांगीलाल ओसवाल यांनी उपस्थित केला आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांना रस्ते वाहतुकीचा वापर करावा लागतो. मध्य रेल्वेकडून तर प्रगती एक्स्प्रेसला पनवेल आणि कर्जतवरून वळसा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एलटीटी ते शिवाजीनगर पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून युध्दपातळीवर करण्यात येत होता.
कुर्ला ते शिवाजीनगर अंतर १७0 किलोमीटर आहे. ही सेवा सुरू केल्याने वाशी, बेलापूर, पनवेल, कर्जत, लोणावळा स्थानकावर या गाडीला थांबा देण्याचा विचार केला जात होता. या मार्गावरून १२ डबा किंवा जास्तीत जास्त १६ डब्यापर्यंतच्या गाड्या चालविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत होते. ही सेवा सुरू झाल्यास शिवाजीनगरपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना पावणेतीन तास लागणार होते.
सध्या मुंबई-पुणे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना तीन ते साडेतीन तास लागतात. पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग दुहेरी झाल्याशिवाय मेमू प्रकल्प सुरू करता येणार नाही, असे मध्य रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. पनवेल-कर्जत या मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव असून तो पूर्ण झाल्याशिवाय कुर्ला ते शिवाजीनगर पुणे अशी मेमू गाडी धावू शकणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.