पुरुषांनाही हवा आहे साहाय्यता कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:17 PM2018-10-21T23:17:07+5:302018-10-21T23:17:30+5:30

महिला साहाय्यता कक्षाप्रमाणे पुरुषांसाठी देखील साहाय्यता कक्षाची मागणी पुढे येऊ लागली आहे.

Men want help | पुरुषांनाही हवा आहे साहाय्यता कक्ष

पुरुषांनाही हवा आहे साहाय्यता कक्ष

Next

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : महिला साहाय्यता कक्षाप्रमाणे पुरुषांसाठी देखील साहाय्यता कक्षाची मागणी पुढे येऊ लागली आहे. अशा प्रकारच्या ११५ तक्रारी वर्षभरात पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. पती-पत्नीमध्ये वादाला प्रत्येक वेळी पुरुषालाच दोषी न धरता महिलांमुळे देखील कौटुंबिक वाद होत असून त्यात पुरुषांना मनस्ताप होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अथवा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी पोलिसांतर्फे महिला साहाय्यता कक्ष तयार करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा आकडा वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. मात्र या तक्रारींमध्ये काही पुरुष तक्रारदार देखील पुढे येवू लागले आहेत. गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाकडे चालू वर्षात महिलांचे ५६५ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारे अत्याचार याशिवाय पती- पत्नीमधील वादांच्या प्रकारांचा समावेश आहे. अशा तक्रारी निकाली काढण्यासाठी महिला साहाय्यता कक्षामार्फत योग्य पद्धतीचा तपास करून महिलेसमोरील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा सासू-सुना यांच्यातील किरकोळ वैचारिक मतभेद देखील पती-पत्नीला टोकाची भूमिका घ्यायला कारणीभूत ठरतात. यामुळे घटस्फोटाची देखील प्रकरणे घडत आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करून सामंजस्याने वाद मिटवले जातात.
परंतु कौटुंबिक वादाला प्रत्येक वेळी पती अथवा सासरच्या व्यक्तीच कारणीभूत असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचेही काही पतींचे म्हणणे आहे. काही महिला कायद्याने मिळालेल्या संरक्षणाचा दुरुपयोग करून पती व सासरच्या व्यक्तींचाच छळ करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्यानुसार चालू वर्षात महिला साहाय्यता कक्षाकडे कौटुंबिक वादातून प्राप्त झालेल्या ५६५ तक्रारींमध्ये ११५ तक्रारी पत्नी पीडित पुरुषांच्याही आहेत. पत्नीच्या आई-वडिलांचा संसारात हस्तक्षेप, पत्नीकडून होणारा मनस्ताप, सासू-सासºयांकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक कारणांचा त्यात समावेश आहे. अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पोलिसांनी महिला साहाय्यता कक्षाप्रमाणेच पुरुष साहाय्यता कक्षाची देखील सुरवात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हल्ली पती-पत्नी नोकरीला जात असल्याने मुले व घर कोण सांभाळणार यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होतात. अशावेळी नकळतपणे मुलाच्या आई- वडिलांवर ती जबाबदारी पडत असते. परंतु काही पतींना ते मान्य नसल्याच्या कारणावरून देखील लग्नाच्या काही वर्षातच त्यांच्यातला वाद घटस्फोटापर्यंत पोहचत आहे. त्यात उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा सर्वाधिक समावेश आहे. विवाह नोंदणीची आॅनलाइन साइट, फेसबुकवरील मैत्री यातून जुळलेली लग्ने अशाच वादातून अवघ्या महिन्याभरात मोडल्याचेही प्रकार घडले आहेत. भविष्यात पुरुषांनाही कायद्याने आधार मिळण्याची गरज भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
>संसार आपला व्हायला हवा
बहुतांश दाम्पत्यांमध्ये ‘माझे घर, माझा संसार‘ अशी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टीवरून त्यांच्यात सतत वाद होवून टोकाची भूमिका घेतली जात आहे. अशा प्रकरणांची तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यातील वादाची कारणे समजून घेवून त्यांचे समुपदेशन केले जाते. प्राप्त तक्रारींमध्ये महिलांसह काही पतींनी देखील पत्नीविरोधात तक्रारी केल्या आहेत. महिलांप्रमाणेच पुरुषांसाठी देखील साहाय्यता केंद्र असावे अशी त्यांची मागणी आहे. परंतु दाम्पत्यांनी ‘आपले घर, आपला संसार‘ अशी भावना राखल्यास त्यांच्यात वादाचे प्रसंगच उद्भवणार नाहीत.
- मीरा बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक- महिला साहाय्यता कक्ष
सध्या सोशल मीडियावरून देखील अनेक रेशीमगाठी जुळून येत आहेत. परंतु केवळ प्रथमदर्शनी आकर्षणातून जुळून आलेले नातेसंबंध काही दिवसातच जबाबदारीच्या जाणिवेनंतर टोकाला पोचत आहेत.
अपवादात्मक प्रेमसंबंध वगळता बहुतांश प्रेमविवाह टिकत नाहीत. कालांतराने त्यांच्यातील वैचारिक मतभेद समोर येवू लागतात. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास घटस्फोटाच्या निर्णयातून त्यांच्याकडून कोर्टाची पायरी चढली जात आहे.
अशावेळी कुटुंबप्रमुखांनी मध्यस्थी करणे आवश्यक असतानाही तसे होत नसल्याने मुलीच्या व मुलाच्या दोन्ही कुटुंबांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Men want help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस