लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून १५ लाख २० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यात एका आफ्रिकन व्यक्तीचा समावेश आहे. अमली पदार्थ विक्रीसाठी काहीजण येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोन्ही कारवाया केल्या आहेत.
शहरात चालणारे अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार पोलिसांकडून अमली पदार्थांचे सेवन करणारे, विक्रेते यांच्यावर कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून देखील शहरात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर नजर ठेवून होते. यामध्ये शुक्रवारी सकाळी नेरुळ येथे काहीजण अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी उपनिरीक्षक कुलदीप मोरे, हवालदार रमेश तायडे, संजय कुलकर, उत्तम लोखंडे, गणेश पवार, राकेश आहिरे, आनंत सोनकुड यांचे पथक केले होते. त्यांनी नेरूळमध्ये सापळा रचून दोघा संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ८९ ग्राम मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत ८ लाख ९० हजार रुपये आहे. याप्रकरणी इमरान गुलशन खान (३४) व Effane Anueue यांना अटक करून त्यांच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Effane हा मूळचा आफ्रिकेचा राहणारा असून तो कोपरी गावात राहायला आहे.
त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री याच पथकाने तळोजा येथे सापळा रचून गणी अब्बास शेख (३५) व आतिक अजित चौधरी यांना अटक केली आहे. दोघेही खारघरचे राहणारे आहेत. त्यांच्याकडून ६३ ग्राम वजनाचे ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात पोलिसांच्या कारवाईत मेफेड्रोन हा अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्याची एक ग्रामची किंमत दहा हजार रुपये असूनही हा अमली पदार्थ सर्रास विकला जाऊ लागला आहे. त्यामुळे यामागे आंतराष्ट्रीय टोळीचा समावेश आहे का याचा उलगडा करण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिस करत आहेत.