नवी मुंबई - अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 17 लाख 50 हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीडी सेक्टर 15 येथील खाडीकिनारी भागात अमली पदार्थ विक्रेते येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांचे पथक केले होते. त्यांनी मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास सीबीडी सेक्टर 15 येथील खाडीकिनारी सापळा रचला होता. त्यामध्ये तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या झडतीमध्ये 175 ग्रॅम मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला. त्याची किंमत 17 लाख 50 हजार रुपये आहे.
याप्रकरणी सलीम शाह, दिपक शाह व फिरोज खान यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सलीम हा तळोजाचा राहणारा असून इतर दोघे घाटकोपरचे राहणारे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत.