मधुकर ठाकूर
उरण : करंजा-उरण नौदल शस्त्रागारातील आयएनए-अभिमन्युमध्ये सेफ म्हणून काम करणारा २२ वर्षीय जवान नौदल अधिकारी विशाल महेश कुमार हा ३ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाला आहे. शोध घेण्यात पोलिस, नौदल विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही मागील पाच दिवसांपासून अक्षम्य दिरंगाई होत असल्याने जैसा कैसा ही हो मेरा लाल मुझे वापस लौटा दो अशी आर्त साद मातेने पोलिस, नौदलाला घातली आहे.
उत्तरप्रदेशातील धपरौली गाव व बागपत जिल्ह्यातील विशाल महेश कुमार (२२) हा जवान १९ महिन्यांपूर्वी उरण- करंजा येथील नौदलाच्या सेवेत दाखल झाला होता.नौदल शस्त्रागारातीलआयएनए-अभिमन्युमध्ये सेफ म्हणून काम करणारा जवान अधिकारी ३ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाला आहे.त्यामुळे नौदल अधिकाऱ्यांनी विशालच्या आईवडीलांना तत्काळ बोलावून घेतले.
मुलाच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने बैचेन झालेली आई मधु व वडील महेश कुमार आपल्या दुसऱ्या लहान मुलासह मुंबई गाठण्यासाठी विमानाची तिकिटे बुक केली.मात्र विमानतळावर वेळेवर पोहचता आले नसल्याने विमान सुटले.मात्र दुसरे विमान विलंबाने सुटणार असल्याने धीर सुटलेल्या आईवडीलांनी बागपत ते उरण हे ३५०० किमी ३६ तासांचे अंतर खासगी भाड्याच्या कारने पार करून उरण गाठले.
इथे पोहोचल्यावर नौदल अधिकाऱ्यांनी विशालच्या बेपत्ता होण्याची पोलिसात साधी तक्रारही दाखल केली नसल्याचे निदर्शनास आले.नौदलाच्या प्रोटोकॉल प्रमाणे सात दिवसांनंतर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.नौदल अधिकाऱ्यांच्या या अजब व्यक्तव्याने संभ्रमात सापडलेल्या आईवडीलांनी अखेर नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने उरण पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.मात्र बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतरही नौदल, पोलिस अधिकारी विशालचा शोध घेण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप आईवडील व भावांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
पोलिस, नौदल अधिकारी बेपत्ता विशालचा शोध घेण्यात दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वताहून चौकशी सुरू केली. मित्र व सहकाऱ्यांकडे चौकशी केली असता विशाल हा ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०२ ते १०.५६ वाजेपर्यंत उरण नगरपरिषदेच्या बाळासाहेब ठाकरे स्विमिंग पूलात पोहण्यासाठी गेला असल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.मात्र येथील रजिस्टरमध्ये येण्याजाण्याबाबत कोणत्याही नोंदी आढळून आलेल्या नाहीत.तसेच ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताचे विशालचे शेवटचे मोबाईल लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन आले असल्याची माहिती आईवडीलांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आईवडील व चुलत भाऊ अमन भटनागर यांनी चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.मात्र पोलिसही सहकार्य करण्यास उत्सुक नसल्याचा आरोप आई-वडीलांनी केला आहे.उलट विशाल मित्र व एका नौदल अधिकाऱ्याला वरिष्ठांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यामुळे परिस्थिती संशयास्पद स्थितीत येऊन ठेपली असुन नौदल अधिकारी काही तरी लपवित असल्याचा आरोप विशालच्या आईवडीलांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.पोलिस, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी निःपक्षपाती चौकशी सुरू न केल्यास या संशयित प्रकरणाची सीआयडी, सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.बेपत्ता मुलाचा शोध घेण्यात आणखी दिरंगाई केल्यास पोलिस ठाण्यासमोरच कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशाराही हताश झालेल्या आईवडीलांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
पोलिस,नौदल विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही मागील पाच दिवसांपासून अक्षम्य दिरंगाई होत आहे. मात्र जैसा कैसा ही हो मेरा लाल मुझे वापस लौटा दो अशी आर्त साद मातेने पोलिस, नौदलाला पत्रकारांसमोरच घातली आहे. नौदलाच्या बेसकम्पमधून एक ऑफिसर बाहेर येतो आणि बेपत्ता होतो, यावर नौदलाकडून कोणतीही कारवाई करण्यात होत नाही. हे सगळं संशयास्पद असल्याचं आईवडीलांचे म्हणणे आहे.