लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले. जवळपास पाच तास मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. बाजार समिती सभापतींनी कामगार व व्यापारी प्रतिनिधींची चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी समितीची नियुक्ती केल्यानंतर मार्केट पूर्ववत सुरू करण्यात आले.
बाजार समितीमध्ये कोणत्याही गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये असा नियम केंद्र शासनाने केला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही गोणींमध्ये ५० पेक्षा जास्त किलो माल भरला जात आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे. परंतु यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी एक दिवस बंदही केला होता. गुरुवारी तीन ठिकाणी जादा वजन आल्यामुळे कामगारांनी निदर्शनास आणून दिले. वारंवार या विषयावरून मतभेद होत असल्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी मार्केट बंदचे आवाहन केले. सकाळी दहा वाजता कांदा मार्केट बंद करण्यात आले. व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये झालेल्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी सभापती अशोक डक यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी या नियमांची राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अंमलबजावणी व्हावी फक्त मुंबईमध्ये सक्ती करू नये अशी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांची अडवणूक होऊ नये अशी मागणीही केली. कामगार प्रतिनिधींनी आरोग्याच्या दृष्टीने गोणीचे वजन जास्त नसावे व नियमांचे पालन करावे अशी भूमिका मांडली. अखेर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली असून पुढील आठ दिवसात समितीने योग्य तोडगा काढावा, असे निश्चित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कांदा-बटाटा मार्केटमध्ये निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी सभापतींनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत व्यापारी व कामगार प्रतिनिधींनी चर्चा करून समिती गठीत केली आहे. सदर समिती हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. - अशोक वाळुंज, संचालक कांदा-बटाटा मार्केट
कृषिमालाची गोण ५० किलोपेक्षा जास्त वजनाची नसावी असा केंद्र शासनाचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त वजनाची गाेण नसावी यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. - चंद्रकांत पाटील, माथाडी नेते