- नामदेव मोरे, नवी मुंबई मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील कोणत्याच व्यापाऱ्यांनी अद्याप महापालिकेचा साठा परवानाही घेतलेला नाही. यामुळे पालिकेचे वर्षाला लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. पालिकेने याविषयी कडक भूमिका घेत व्यापाऱ्यांना लवकरच नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक व्यापारी नियमांची पायमल्ली करू लागले आहेत. दिवाळीदिवशी मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर मोठ्याप्रमाणात नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मसाला मार्केटमध्ये अनेक ठिकाणी बदाम फोडण्याच्या मशीन बेकायदेशीरपणे बसविण्यात आल्या आहेत. गाळ्यांच्या छताचाही व्यावसायिक वापर सुरू केला आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. कार्यालयासाठी दिलेल्या जागेचाही गोडावूनप्रमाणे वापर सुरू केला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये सर्व व्यावसायिकांना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. बाजार समितीमध्ये कृषी मालाची साठवणूक केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी साठा परवाना घेणे बंधनकारक आहे. साठा परवान्यासाठी वर्षाला प्रतिचौरस मीटरला फक्त १५० रूपये फी आकारली जाते. परंतु करोडो रूपयांचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अद्याप हा परवानाच घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वीच मार्केटमधील बांधकाम करतानाही महापालिकेची परवानगी अनेक वेळा घेतलेली नाही. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. महापालिका या परिसरात सुविधा देते परंतु व्यापारी मात्र सर्व नियम पायदळी तुडवत असून पालिकेचा महसूलही चुकवत आहेत. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा स्वायत्त कारभार सुरू आहे. येथील व्यापारावर बाजार समितीचे नियंत्रण आहे. यानंतरही मार्केट महापालिका क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्याकडून आवश्यक परवाने घेणे आवश्यक होते. यापूर्वी एलबीटी असतानाही मसाला मार्केटमधील व्यापारी व्यवस्थित एलबीटी भरत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत केली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांना व्यापारी दप्तर तपासणीसही विरोध करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील व्यापाऱ्यांनी साठा परवाना घेतला नसल्यामुळे महापालिकेचे प्रत्येक वर्षी लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. पालिकेच्या परवाना विभागानेही याकडे आतापार्यंत गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. परंतु आता परवाना विभागाने याविषयी कडक भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. बाजार समितीमधील गाळ्यांची सविस्तर माहिती घेतली जात आहे. संबंधितांना नोटीस पाठवून साठा परवाना त्वरित घेण्यास सांगितले जाणार असून वेळ पडली तर कारवाई केली जाणार आहे. बदाम फोडण्यासही परवाना नाहीबाजार समितीमध्ये बदाम फोडण्याचे काम करणाऱ्या गाळ्यात दिवाळीदिवशी आग लागली होती. या गाळ्यात छतावरही तीन मशीन बसविण्यात आल्या होत्या. तळमजल्यावर एक मशीन बसविण्यात आली होती. शहरात दळण दळण्याची चक्की सुरू करण्यासाठीही महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. परंतु मार्केटमध्ये बेकायदेशीर कारखाना सुरू करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीमधील मार्केटनिहाय गाळे संख्या कांदा - बटाटा मार्केट २४३मसाला मार्केट६६०धान्य मार्केट४१२फळ मार्केट१०२९भाजी मार्केट ९३६विस्तारित मार्केट२८५शॉप कम गोडावून १९३
व्यापाऱ्यांकडे साठा परवाना नाही
By admin | Published: November 17, 2015 12:45 AM