- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : आरटीई ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पालकांना यंत्रणेतील गोंधळामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. संकेतस्थळावर जिल्ह्यांच्या यादीतून नाशिक वगळता इतर जिल्हे गायब असल्याने पाल्याच्या नावाची नोंदणीच होऊ शकलेली नाही. तर संकेतस्थळावर मराठीतून मदतकेंद्राची नावाची पाटी कोरीच असल्याने यंत्रणेतील सावळागोंधळ उघड झाला.बालकांना शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार शासनातर्फे आरटीई २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. वंचित गटांतर्गत तसेच दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण घेता यावे, याकरिता आॅनलाइन नोंदणीद्वारे त्याना मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, या संधीचा लाभ घेताना पालकांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर येत आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी जाहीर करण्यात आलेली दोन्ही संकेतस्थळ पालकांना गोंधळात टाकत आहेत. सन २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, ती २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी यंत्रणेतील गोंधळ उघड झाला आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी करण्यासाठी वास्तव्याच्या जिल्ह्याची नोंद आवश्यक आहे. मात्र, संकेतस्थळावर केवळ नाशिक जिल्हाच उपलब्ध असून, उर्वरित ३५ जिल्हे अद्याप नोंदीवर आलेले नाहीत. यामुळे पहिल्याच दिवशी पाल्याची नोंदणी करण्याचा प्रयत्न असलेल्या पालकांच्या पदरी निराशाच आली.नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या काही पालकांनी या घोळामुळे मदतकेंद्राची यादी तपासली असता, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे नंबर चुकीचे असल्याचेही आढळून आले, तर गेल्या अनेक वर्षांपासून संकेतस्थळावर चुकीचे नंबर छापले जात असल्याने संबंधितांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही उघड झाले. तर संकेतस्थळ मराठीतून उघडल्यास त्यात ठाणे जिल्ह्यातील मदतकेंद्राच्या अधिकाºयांच्या नावाची पाटी कोरीच असून, केवळ नंबर झळकत आहेत. त्यामुळे मदतीसाठी संपर्क करायचा तर कसा व कोणाला? असा प्रश्न पालकांना सतावत आहे. तर संपूर्ण राज्यासाठी असलेल्या हेल्पलाइनचा नंबरही चुकीचा असल्यानेही पालकांची गैरसोय होताना दिसत आहे.मंगळवारी सकाळपासून कोणत्याही अडथळ्याविना प्रवेश प्रक्रिया सुरू होणे पालकांना अपेक्षित असतानाही, दुपारी ४ नंतर संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातही नोंदणीपासून ते मदतीपर्यंत अनेक त्रुटी असल्याने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिलाच दिवस पालकांना गैरसोयीचा ठरला.
ऑनलाइन आरटीई प्रवेश यंत्रणेचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:11 AM