नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी सन १९४९ मध्ये भारतीय राज्यघटना प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर केली. या संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील महाविद्यालये, शाळा, सरकारी कार्यालये, तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राज्यघटनेतील समतेच्या व एकात्मतेच्या तत्त्वाचा जनसामान्यांमध्ये व्यापक प्रसार व्हावा यादृष्टीने साजरा होणारा संविधान दिन नवी मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत आंभिरा सामाजिक संस्थेच्या सहयोगाने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासमवेत उपस्थितांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. देशाच्या विविधतेला एकत्रित जोडण्याचे काम लोकशाही बळकट करणाऱ्या राज्यघटनेमुळे होत असल्याचे सांगत बाबासाहेबांचे अथांग चरित्र कार्य प्रदर्शनातील छायाचित्रांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचेल व विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांना प्रेरणा मिळेल यासाठी हा उपक्रम राबविल्याची माहिती महापौरांनी दिली.महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही मूलतत्त्वे संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती व्हावीत व ही तत्त्वे जीवनात अंगीकारली जावीत असे सांगितले. स्मार्ट सिटीची निर्मिती नागरिकांच्या संकल्पनांना प्राधान्य देत घटनेची मूलतत्त्वे अंगीकारून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाला तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहातील त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहाराची छायाचित्रे तसेच त्यांनी वापरलेल्या साहित्याची छायाचित्रे यांच्या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)तुर्भ्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषा धारण करुन त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले. तसेच भारतीय संविधानातील महत्त्वाच्या घटनांची माहिती देऊन त्यांचे वाचन करण्यात आले. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन येथे संविधान दिन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संविधानातील महत्त्वाच्या घटनांची माहिती देऊन त्यांचे वाचन करण्यात आले. यावेळी सिडको कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रध्दांजलीनवी मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्राणांची बाजी लावून वीरमरण पत्करणाऱ्या हुतात्मा पोलीस अधिकारी-कर्मचारी व सैन्य दलातील जवानांना शहरातील विविध भागांमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.वाशीतील शिवाजी चौक परिसरात नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून शिस्तबध्द पध्दतीने श्रध्दांजली वाहिली. यावेळी नवी मुंबई पोलीस दलाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही वाशीत रॅलीच्या माध्यमातून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. कोपरखैरणेतील रा.फ.नाईक शाळेच्या वतीने भव्य रॅलीच्या माध्यमातून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. शाळेतील शेकडो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशी रेल्वेस्थानक परिसरात महानगरपालिका आणि मुस्लीम एकता फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या हल्ल्यात कित्येक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली यासाठी त्यांना अभिवादन म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मुस्लीम एकता फाऊंडेशनचे संस्थापक अब्बास मुल्ला यांनी सांगितले. २००हून अधिक नागरिकांनी या ठिकाणी रक्तदानाचा हक्क बजाविला असून महानगरपालिकेच्या रक्तपेढीत रक्त संकलन करण्यात आले. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, बसस्थानके तसेच महत्त्वाच्या परिसरात हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. (प्रतिनिधी)
संविधान दिनानिमित्त शहरवासीयांनी दिला एकात्मतेचा संदेश
By admin | Published: November 27, 2015 2:21 AM