नवी मुंबई : तुर्भे नाका, बोनसरी व दगडखाणीमध्ये तीन मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले आहे. शिवप्रेम मित्र मंडळ २१ वर्षे मशिदीजवळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे. उत्सवाची सुरवातही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बोनसरी व बबनशेठ कॉरीमधील मंडळामध्येही मुस्लीम व इतर धर्मीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, अत्यंत शांततेमध्ये हे उत्सव साजरे केले जात आहेत. तुर्भे नाका येथील शिवप्रेम मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. राजू शेख या मुस्लीम शिवसेना पदाधिकाऱ्याने या उत्सवाची सुरवात केली. येथील मशिदीजवळ दोन दशकांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. संस्थापक राजू शेख यांच्याबरोबर अमोल टेंकाळे, गंगाराम हलवाई, अशोक भामरे, फिरोज सिद्दिकी, अजीज शेख, समर नाथ केवट, सचिन कांबळे व इतर पदाधिकारी उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्तही अनेक मुस्लीम नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. दोन दशकांमध्ये उत्सवावर कधीच प्रचंड खर्च केला जात नाही. अत्यंत कमी जागेत मंडप घातला जातो. वाहतुकीला अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाते. दोन दशकांपासून मिरवणूकही शांततेमध्ये पार पाडणाऱ्या मंडळामध्ये शिवप्रेमचा समावेश आहे. बोनसरी गावातील शिव स्वामी समर्थ मित्र मंडळाच्यावतीनेही जवळपास १० वर्षापासून गणेशोत्सव साजरा होतो. मोहम्मद शेख यांनी या उत्सवाची सुरवात केली. सद्यस्थितीमध्ये सागर मनगुटकर, मेहबूब पटेल, दीपक गायकवाड व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रसिद्धी व पुरस्काराचा विचार न करता मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सव साजरा करत असून यामुळे परिसरात सामाजिक सलोखा कायम राखण्यात यश आले आहे. याच परिसरातील बबनशेठ पाटील युवा मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाचे अध्यक्षपदही सुलतान शेख या मुस्लीम पदाधिकाऱ्याकडे आहे. याशिवाय प्रवीण सुतार, इस्माईल शेख, अंबादास निंबाळकर, मेहबूब जमादार हे पदाधिकारीही परिश्रम घेत आहेत. याशिवाय शहरातील अनेक मंडळांमध्ये मुस्लीम व इतर धर्मीय पदाधिकारी भक्तिभावाने सहभाग घेत आहेत.
गणेशोत्सवामधून सर्वधर्मसमभावाचा संदेश
By admin | Published: September 15, 2016 2:37 AM