मीटर रीडिंगच्या दिरंगाईचा ग्राहकांना फटका, वीज बिल झाले दुप्पट : बिलांमध्ये दुरूस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:11 AM2017-10-11T03:11:48+5:302017-10-11T03:12:07+5:30
मीटर रीडिंग वेळेवर घेतले जात नसल्याचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी मीटर रीडिंग केल्यामुळे वीज बिलांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मीटर रीडिंग वेळेवर घेतले जात नसल्याचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी मीटर रीडिंग केल्यामुळे वीज बिलांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. बिलांमध्ये दुरुस्ती करून द्यावी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाºयांनी केली आहे.
महावितरण कंपनीने मीटर रीडिंग घेण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदारांनी पूर्वीचे रीडिंग घेतल्याच्या ३० दिवसांच्या आतमध्ये पुन्हा रीडिंग घेऊन ते बिल तयार करणाºया प्रणालीकडे देणे आवश्यक आहे. मीटर रीडिंगची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत; परंतु ठेकेदार वेळेवर नोंद घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एक महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी अनेक ठिकाणी रीडिंग घेतल्याचे निष्पन्न झाले.
नेरुळ पश्चिमेला आॅगस्ट महिन्यामध्ये ३ तारखेला मीटर रीडिंग घेण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये ८ दिवस उशिरा अर्थात ११ सप्टेंबरला नोंद घेण्यात आली आहे. यामुळे बिलांमध्ये चक्क दुप्पट वाढ झाली आहे. विजेच्या वापरावर अधारित विजेचा दर निश्चित केला आहे. १०० युनिटपर्यंत ३ रुपये, ३०० युनिटपर्यंत ६ रुपये ७३ पैसे, ३०० ते ५०० दरम्यान ९ रुपये ७० पैसे दर आकारण्यात येतो. वेळेवर रीडिंग न घेतल्याने अनेकांच्या युनिट वापरामध्ये फरक पडून बिलाची रक्कम वाढते.
राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरुळ प्रभाग ८६ चे वार्ड अध्यक्ष महादेव माणिकराव पवार यांनी महावितरण अधिकाºयांना पत्र दिले आहे. वाढीव बिल आलेल्या राणा जयप्रकाश जगताप, गणपत प्रभात दळवी यांच्यासह अनेकांची बिले सादर केली आहेत. या बिलांवरील मीटर रीडिंगच्या तारखेमध्ये ८ ते १० दिवसांचा फरक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महावितरण अधिकाºयांनी तत्काळ बिलांमध्ये दुरुस्ती करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. महावितरण अधिकाºयांनीही त्रुटी निर्माण झाल्या असतील त्यांना दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.