- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : नामांकित बॉलिवूड स्टारचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या अनिर्बान दास बल्ला (४०) यांनी गुरुवारी मध्यरात्री वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर चार तरुणींनी 'मीटू' प्रकरणाअंतर्गत आरोप केले आहेत. यामुळे कंपनीची बदनामी होत असल्याच्या कारणावरून तीन भागीदारांनी देखील त्यांना दूर केले आहे.
नाना पाटेकर, अलोक नाथ यांच्यानंतर 'मीटू' प्रकरणातून इतरही अनेकजणांची नावे पुढे येऊ लागली आहेत. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड व्यवस्थापक अनिर्बान दास बल्ला यांच्यावर देखील चार तरुणींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मोठमोठ्या अभिनेत्यांचे काम सांभाळणाऱ्या बल्ला यांच्या KWAN या कंपनीपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत. यावरून कंपनीच्या इतर तीन भागीदार व बल्ला यांच्यात वाद सुरु आहेत. या संपूर्ण प्रकरणातून झालेल्या बदनामीला कंटाळून बल्ला यांनी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु देवी विसर्जनाच्या निमित्ताने परिसरात बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, शेखर बगाडे व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले.
पुलावर अंधाराच्या ठिकाणी एक व्यक्ती उभी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. त्यानुसार वाहतूक पोलीस त्याठिकाणी गेले असता, बल्ला हे पुलाच्या कठड्यावर उभे राहून खाडीत उडी मारण्याच्या तयारीत होते. यावेळी पोलिसांनी तात्काळ त्यांना खाली खेचून वाचवले. चौकशीत त्यांनी 'मीटू' प्रकरणात झालेल्या बदनामी मुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.