महानगर गॅसच्या खोदकामामुळे पनवेलमध्ये वाहतुकीस अडथळा; चालकांसह नागरिकही त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:06 AM2020-01-18T00:06:53+5:302020-01-18T00:07:15+5:30
सम-विषम पार्किं गवरील कारवाई थांबविण्याची मागणी
पनवेल : खांदा वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून गॅसवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. खोदकामामुळे शहरात पार्किंगसाठी जागा शिल्लक नाहीत. अपुऱ्या जागेत सम-विषम पार्किंगचा नियम पाळणे शक्य होत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात सम-विषम पार्किंगची कारवाई थांबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात ठिकठिकाणी गॅसवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे, त्यामुळे सम-विषम पार्किंगचा नियम पाळणे, चालकांना शक्य होत नाही. अनेकदा वाहतूककोंडीची समस्या उद्भवते तर काही वेळा वाहतूक पोलीस टोइंगव्हॅनद्वारे वाहन उचलून दंडात्मक कारवाई करतात. महानगर गॅसवाहिनीच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरातील वाहतूक पोलिसांच्या कारवाईने संतप्त झालेल्या नागरिकांनी पनवेल महापालिका प्रभाग ‘ब’चे सभापती संजय भोपी यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर भोपी यांनी कळंबोली वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार करून महानगर गॅसचे खोदकामाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सम-विषम स्वरूपाची कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
खांदा वसाहतीत ज्या ज्या ठिकाणी महानगर गॅसवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे, त्या ठिकाणची पाहणी करण्यात येईल, त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. - अंकुश खेडकर, व.पो.नि. वाहतूक शाखा, कळंबोली