नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही आता मेट्रोचे जाळे; ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोलीपर्यंत विस्तार
By कमलाकर कांबळे | Published: December 6, 2023 08:04 PM2023-12-06T20:04:48+5:302023-12-06T20:05:04+5:30
मागील अकरा वर्षांपासून रखडलेला बेलापूर ते पेंधर हा अकरा किमी अंतराचा मेट्रो मार्ग अखेर गेल्या महिन्यात प्रवासी सेवेसाठी खुला झाला आहे.
नवी मुंबई : मागील अकरा वर्षांपासून रखडलेला बेलापूर ते पेंधर हा अकरा किमी अंतराचा मेट्रो मार्ग अखेर गेल्या महिन्यात प्रवासी सेवेसाठी खुला झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहून सिडकोचा हुरूप वाढला असून, पूर्वनियोजित उर्वरित तीन टप्प्यांसह नवी मुंबई महापालिका क्षेत्रातसुद्धा मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू केल्याची माहिती सिडकोच्या विश्वासनीय सुत्रांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दळणवळणाच्या अद्ययावत सुविधांवर भर दिला आहे. त्यापैकी रस्ते वाहतुकीला सर्वोत्तम पर्याय म्हणून मेट्रो सेवेचा उल्लेख केला जात आहे. त्यानुसार मेट्रोचे चार टप्प्यात चार मार्ग सुरू करण्याचे नियोजन केले. यापैकी बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा २०११मध्ये शुभारंभ करण्यात आला. मात्र, विविध कारणांमुळे या मार्गाचे काम दीर्घकाळ रखडले. अखेर सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळात या प्रकल्पाच्या कामाला गती देऊन हे काम आणि संचालनालयाची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली. महामेट्रोने निर्धारित कालावधीत या मार्ग क्रमांक १चे काम पूर्ण करून गेल्या महिन्यात त्याचे लोकार्पण केले. मागील पंधरा दिवसांत या मेट्रो सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता सिडकोने आता उर्वरित तीन टप्प्यांच्या कामावरही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार मार्ग क्रमांक २, ३ आणि ४ साठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामावर भर दिला आहे. पुढील दोन महिन्यात हा अहवाल तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नोडस मेट्रोने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाला सक्षम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असे सिडकोला वाटते.
मेट्रोच्या चार टप्प्यांचा तपशील
- मार्ग क्रमांक लांबी स्थानके खर्च (कोटी)
- बेलापूर ते पेंधर : ११ किमी ११ ३०६३.६३ (पूर्ण)
- एमआयडीसी तळोजा ते खांदेश्वर : ८.६० १४ १०२७.५३
- पेंधर ते एमआयडीसी तळोजा: ४.२० ०६ ५०१.८२
- पेंधर ते एमआयडीसी तळोजा: २.८० ०२ ३३४.५४
- एकूण: २६.७० ३३ ४९२७.५२
मानखुर्दपर्यंत विस्ताराची योजना
एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोच्या मार्ग क्रमांक ८चे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग मानखुर्दपर्यत विस्तारीत होणार आहे. हा मार्ग मेट्रो मार्ग क्रमांक ८ ए अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाेडण्याची योजना आहे. त्यानुसार सिडकोने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समितीही नियुक्त केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्द या नियोजित मेट्रो मार्गाचे अंतर १४.४० किमी इतके आहे.
मेट्रोचा विस्तार ऐरोलीपर्यंत...
रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून मेट्रो सेवा अधिक सुरक्षित आणि सुलभ मानली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दक्षिण नवी मुंबईसह उत्तर नवी मुंबई क्षेत्रात मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही क्षेत्रांना जोडणाऱ्या मेट्रोच्या बेलापूर स्थानकापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि नेरूळ या नोड्सपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे.