बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सज्ज, सुरक्षा आयुक्तांनी दिला हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:28 AM2023-06-22T11:28:04+5:302023-06-22T11:28:59+5:30
रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सक्षम दळवळण यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून मेट्रोचे चार उन्नत मार्ग प्रस्तावित केले आहेत.
नवी मुंबई : गेल्या एक तपापासून प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबईचा मेट्रोचा प्रवास आता खऱ्या अर्थाने दृष्टीपथात आला आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या पहिल्या क्रमांकाच्या मार्गावरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआयएस) बुधवारी हिरवा कंदील दिला. तसे प्रमाणपत्र सिडकोला प्रदान केले आहे.
रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सक्षम दळवळण यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून मेट्रोचे चार उन्नत मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी बेलापूर ते पेंधर हा ११ किमी लांबीचा मार्ग आता प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले आहे. त्यापैकी पेंधर ते खारघर (सेंट्रल पार्क) या पाच स्थानकांदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएमआयएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
परंतु, विविध कारणांमुळे या टप्प्यातील मेट्रो प्रवास रखडला होता. दरम्यानच्या काळात उर्वरित सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकादरम्यानचे कामही पूर्ण करण्यात आले. गेल्या महिन्यात या मार्गावर चाचणी घेऊन स्थानकांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर २१ जून रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सिडकोला प्रदान केले. त्यामुळे आता बेलापूर ते पेंधर हा संपूर्ण मार्ग मेट्रो सेवेसाठी सज्ज झाला आहे.
परिचालनाची जबाबदारी महामेट्रोवर
मेट्रोच्या परिचालनाची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली आहे.
त्यानुसार महामेट्रोने तिकीट दरही निश्चित केले असून आवश्यक कर्मचाऱ्यांची भरतीही केली आहे.
एकूणच लवकरच या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला.
दरम्यान सीएमआयएसचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी बुधवारी या मार्गावरील सर्व स्थानकांची पाहणी केली.
नवी मुंबई मेट्रोच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. सीएमआयएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच मेट्रो सेवा सुरू केली जाईल.
- अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको