मेट्रोचा मार्ग झाला सूकर

By Admin | Published: February 13, 2017 05:20 AM2017-02-13T05:20:33+5:302017-02-13T05:20:33+5:30

विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेला सिडकोच्या मेट्रो प्रकल्पाने आता गती घेतली आहे. तळोजा पाचनंद येथे उड्डाणपूल बांधण्यास मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविला

Metro route | मेट्रोचा मार्ग झाला सूकर

मेट्रोचा मार्ग झाला सूकर

googlenewsNext

कमलाकर कांबळे / नवी मुंबई
विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेला सिडकोच्या मेट्रो प्रकल्पाने आता गती घेतली आहे. तळोजा पाचनंद येथे उड्डाणपूल बांधण्यास मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे प्रमुख अडथळाही दूर झाल्याने पुढच्या वर्षी मेट्रोच्या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे.
सिडकोने २0११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यात हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे. व्हायडक्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर ही कामे प्रगतीपथावर आहेत; परंतु तळोजा पाचनंद येथे दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर मेट्रोसाठी पूल बांधावा लागणार आहे. त्याच्या परवानगीसाठी सिडकोचा मागील पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर रेल्वेने पुलाला अलीकडेच हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे रखडलेला मेट्रोचा मार्ग सूकर झाला आहे. लवकरच पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. एकूणच मे २0१८मध्ये ११ कि.मी. लांबीचा मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. विशेषत: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी आग्रही आहे. तशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला डिसेंबर २0१४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु विविध कारणांमुळे कामाचा वेग मंदावल्याने ही मुदत २0१५ व नंतर जानेवारी २0१७ पर्यंत वाढविण्यात आली; परंतु मेट्रोबरोबरच सिडकोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैनाचा विकास आणि स्मार्ट सिटी हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने सिडकोने सुरुवातीपासून याच प्रकल्पाला झुकते माप दिले आहे; परंतु आता विमानतळ प्रकल्पही मार्गी लागला आहे. डिसेंबर २0१९मध्ये विमानतळावरून विमानाचे प्रत्यक्ष टेकआॅफ होईल, यादृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. एकूणच शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले विमानतळ व मेट्रो हे दोन्ही प्रकल्प वर्षभराच्या अंतराने लागोपाठ पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन-अडीच वर्षे सिडकोच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

Web Title: Metro route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.