नवी मुंबई : मेट्रोच्या पहिल्या टप्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. नवीन वर्षात बेलापूर ते पेंधर दरम्यान प्रत्यक्ष मेट्रोसेवा सुरू होईल, असा अंदाज संबधित विभागाकडून व्यक्त होत आहे. मेट्रोमुळे दक्षिण नवी मुंबईतील सिडको नोडच्या विकासालासुद्धा गती मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांसह विकासक आणि गुंतवणूकदारांनासुद्धा मेट्रोची प्रतीक्षा आहे.
सिडकोने मेट्रोचे चार मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी पेंधर ते बेलापूर या पहिल्या टप्याचे काम २०११ मध्ये सुरू करण्यात आले होते; परंतु कंत्राटदार आणि सिडको यांच्यातील वादामुळे हे काम रखडले. त्याचा फटका या क्षेत्रातील विकासकामांना बसला. मेट्रोसारखी सुविधा सुरू होणार असल्याने अनेक नागरिकांनी या भागात घरे घेतली; पण प्रकल्प रखडल्याने रहिवाशांची निराशा झाली होती; परंतु सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही सेवा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, कामोठेमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
‘मेट्रो’मुळे चित्र बदलेलतळोजा नोडमध्ये सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जाणार आहेत तसेच या क्षेत्रात खासगी विकासकांनी सुध्दा अनेक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. काही प्रकल्पांचे कामेही सुरू आहेत परंतु दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने या प्रकल्पांना काही प्रमाणात खीळ बसली आहे शिवाय ग्राहकसुद्धा या क्षेत्रात घरे घेण्यास धजावत नाहीत परंतु आता मेट्रो सुरू होणार असल्याने हे चित्र काहीसे बदलेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे.