मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाचे मुर्बी पाडा नावाने बारसे
By कमलाकर कांबळे | Published: January 4, 2024 08:19 PM2024-01-04T20:19:54+5:302024-01-04T20:20:04+5:30
नवी मुंबई : मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर मार्गावरील सेंट्रल पार्क स्टेशनच्या नावावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडता पडला आहे. ...
नवी मुंबई : मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर मार्गावरील सेंट्रल पार्क स्टेशनच्या नावावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडता पडला आहे. अस्मितेचाचा मुद्दा पुढे करून मुर्बी गावातील ग्रामस्थांनी या स्थानकाला मुर्बी असे नाव देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन सिडकोने या स्थानकाचे नाव मुर्बीपाडा असे करण्याचा निर्णय घेऊन तसे निर्देश महामेट्रोला दिले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोची सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक स्थानकाला त्या त्या हद्दीतील गावांची नावे दिली आहेत. परंतु, मुर्बी गावाच्या हद्दीत असलेल्या सातव्या क्रमांकचे स्थानकाला सेंट्रल पार्क असे नाव दिले होते. अस्मितेचा मुद्दा पुढे करून मुर्बी गावातील ग्रामस्थांनी समाजसेवक जगदीश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले होते. विशेष म्हणजे या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
अखेर तीव्र झालेल्या या आंदोलनाची दखल घेऊन सिडकोने मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मुर्बीपाडा असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे पत्र मेट्रोचे संचालन करणाऱ्या महामेट्रोला दिले आहे. त्यानुसार महामेट्रोने कार्यवाही सुरू केली असून, लवकरच सेंट्रल पार्क स्थानकावर मुर्बीपाडा अशा नावाचा फलक दिसेल, असा विश्वास जगदीश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.