म्हसळा : तालुक्यातील सहा गावे, पंधरा वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाणीप्रश्नाबाबत डिसेंबरमध्ये पाठविलेला पाणीटंचाई आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तालुक्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रशासनाने प्राधान्याने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पाण्याचे मूळ स्रोत असणारी ठिकाणे पूर्णपणे आटल्याने तालुक्यातील सहा गावे व पंधरा वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावे, वाडीतील नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. या गावे, वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाईग्रस्त आराखडा पंचायत समिती म्हसळातर्फे १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. परंतु मे महिना सुरू होऊन पाच दिवस झाले तरीही हा आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने या गावातील नागरिकांकडून प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रायगड जिल्हा परिषद व म्हसळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून आ. सुनील तटकरे व जि.प.च्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी तालुक्याचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. मे महिन्याची मासिक सभा ५ मे रोजी होत असून या सभेत पाण्याच्या बाबतीत विषय निश्चित हाताळला जाईल, असे आश्वासन उपसभापती मधुकर गायकर यांनी दिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता असताना जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील योजना पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी व्यक्त केले.(वार्ताहर) पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यापाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कुडगाव कोंड, गायरोणे, तुरु ंबाडी, रोहिणी, आडीठाकूर, सुरई तर वाड्यांमध्ये चंदनवाडी, सांगवड, लेप आदिवासीवाडी, वाघाव बौद्धवाडी, कृष्णनगर, बेटकर वाडी, दगडघुम , निगडी मोहल्ला, रु द्रवट, चिचोंडे, खान्लोशी बौद्धवाडी, गोंडघर बौद्धवाडी, पेढांबे आदिवासीवाडी, आंबेत कोंड विचारे वाडी, आंबेत कोंड रोहिदास वाडी यांचा समावेश आहे.
म्हसळ्याचा पाणीटंचाई कृ ती आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 05, 2017 6:13 AM