अग्निसुरक्षेविषयी एमआयडीसी उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:46 AM2018-04-26T02:46:25+5:302018-04-26T02:46:25+5:30
कंपन्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद : रबाळेसह नेरुळ अग्निशमन दलाला तपासणीचे अधिकारही नाहीत
नामदेव मोरे ।
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आगीचे सत्र सुरू आहे. आगीच्या घटना थांबविण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रबाळे व नेरुळमध्ये अग्निशमन केंद्रे सुरू केली असून, त्यांना फायर आॅडिटचे अधिकारही नाहीत. कोणत्या कंपन्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू आहे व कुठे बंद याचीही माहितीही उपलब्ध नाही. एमआयडीसी मुख्यालयाने सुरक्षेकडे डोळेझाक करायची व आग लागली की जवानांनी जीव धोक्यात घालून ती विझवायची एवढेच काम सुरू असून, अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भीषण दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसीमध्ये २००६मध्ये सावला कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागली. एक आठवडा सुरू असलेल्या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यानंतरची ही सर्वात भीषण आग होती. या घटनेनंतर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अग्निशमन नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दुर्घटनेला १२ वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी ५० ते ६० आगीच्या घटना होऊनही एमआयडीसी प्रशासनाने अद्याप या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यामुळेच खैरणे एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकाच वेळी चार कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग विझविण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे परिसरामधून १५ बंब घटनास्थही हजर होेते; परंतु या बंबांसाठी पटकन पाणी उपलब्ध करून देणारी यंत्रणाच नव्हती. यामुळे बंब असून पाणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. ज्या चार कंपन्यांमध्ये आग लागली तेथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती का? याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ ते १४ तास घटनास्थळी ठाण मांडून आग विझविली. या दुर्घटनेनंतर एमआयडीसीमधील किती कंपन्यांचे फायर आॅडिट झाले आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता कोणत्याच कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्याचे लक्षात आले.
एमआयडीसीमध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त उद्योग आहेत. रिलायन्स, एच. पी. इंडियन आॅइल यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांची कार्यालयेही येथे आहेत. देशातील सर्वात जास्त केमिकल कंपन्याही येथे आहेत. रिलायन्स सारख्या काही कंपन्यांची स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे; परंतु इतर कंपन्यांमध्ये अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत. आग लागल्यास अग्निशमन बंबांना पाणी भरण्यासाठीची यंत्रणाही नाही. सर्वत्र अस्ताव्यस्तपणे साहित्य ठेवलेले असते. यामुळे आग लागल्यानंतर तत्काळ पूर्ण कंपनी जळून खाक होत आहे. अग्निशमन जवानांवर आग विझविण्याची जबाबदारी आहे; पण नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्याचे काहीच अधिकार अग्निशमन कार्यालयांना नसल्याने दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे.
जानेवारी २०१७ पासूनच्या महत्त्वाच्या घटना
३ मार्च २०१७ : पावणे एमआयडीसीत पॉलिकॅब कंपनीला भीषण आग. कोट्यवधी रुपयांचे नुकसान
९ सप्टेंबर २०१७ : साकेत इंडस्ट्रीज या रंग बनविण्याच्या कंपनीला आग, दोन जण किरकोळ जखमी
१७ आॅक्टोबर २०१७ : तुर्भेमधील मॅकॅन्को केमिकल कंपनीमध्ये वेल्डिंगची ठिणगी पडून भीषण आग, पूर्ण कंपनी जळून खाक
३० आॅक्टोबर २०१७ : धिरूभाई अंबानी नॉलेज सिटीमधील रुग्णालयाच्या इमारतीला आग
३ नोव्हेंबर २०१७ : पावणेमधील प्रियंका गारमेंट कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान
१० डिसेंबर २०१७ : महापेमधील स्टॉक होल्डिंग इमारतीला आग, १४ दिवस सुरू असलेल्या आगीमध्ये अनेक सरकारी कार्यालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली
१७ डिसेंबर २०१७ : तुर्भेमधील मोडेप्रो कंपनीला आग, स्फोटामुळे पाच किलोमीटर परिसर हादरला
११ फेब्रुवारी २०१८ : तुर्भेमधील प्रिसीज कंपनीमध्ये आग
२५ फेब्रुवारी २०१८ : पावणेमधील सिंडिकेट वायफर ब्लेड बनविणाºया कंपनीला भीषण आग, दोन मजल्यांवरील साहित्य खाक
१४ मार्च २०१८ : रबाळे एमआयडीसीतीलअँथोनी गॅरेजला आग, चार बस जळून खाक