नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यातील त्या इमारतीवर एमआयडीसी प्रशासनाने शनिवारपासून पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात येथील पांडुरंग या इमारतीवर कारवाई करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एमआयडीसीने कारवाई मोहीम हाती घेतल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला.
उच्च न्यायालयाने दिघा विभागातील ९९ इमारती बेकायदा ठरवून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत येथील काही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर काही इमारतींचा ताबा कोर्ट रिसिव्हरने घेतला आहे. आपली घरे अनधिकृत व्हावीत, यासाठी येथील रहिवासी मागील अनेक वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न करीत आहेत; परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असून, शनिवारी पुन्हा या भागातील बेकायदा इमारतीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी कोर्ट रिसिव्हरच्या समक्ष व एमआयडीसी, सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथील नऊ बेकायदा इमारतींच्या अवस्थेची नव्याने पाहणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी पांडुरंग इमारतीवर कारवाई करण्यात आली. पुढील दिवसांत टप्प्याटप्प्याने उर्वरित इमारतीवर कारवाई केली जाणार असल्याचे एमआयडीसीच्या सूत्राने सांगितले. दरम्यान, या कारवाईचे वृत्त समजताच महापालिकेतील विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, आमदार संदीप नाईक व स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच पुढील आठवड्यापासून बहुतांशी शाळेच्या परीक्षा सुरू होत आहेत. ऐन परीक्षेच्या काळात दिघा विभागात एमआयडीसीची कारवाई सुरू झाल्याने परिसरातील पालक व विद्यार्थ्यांत असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.