जुईनगर येथील नाल्यात एमआयडीसीचे सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:41 AM2019-04-05T01:41:51+5:302019-04-05T01:42:13+5:30
नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष : दुर्गंधीचे साम्राज्य; आरोग्याचा प्रश्न गंभीर
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. त्यामुळे नाल्याच्या कडेला तवंग निर्माण झाला आहे. तसेच नाल्याची सफाई करण्याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जुईनगर आणि सानपाडा भागातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई शहराच्या एका बाजूला एमआयडीसी आणि दुसऱ्या बाजूला नागरी वसाहती आहेत. नागरी वसाहतींच्या बाजूला खाडीकिनारा असून पावसाळी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी नाल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नाल्यात जंगली झाडे, झुडपे तसेच प्रवाहात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. महापालिकेने नाला परिसराची स्वच्छता न केल्याने या नाल्यालगत असलेल्या जुईनगर आणि सानपाडा येथील वसाहतींमधील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसीमधून येणाºया सांडपाण्यावर प्रक्रि या न करताच सांडपाणी नाल्यात सोडण्यात येते, या प्रकाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने शहरातील सर्वच नाल्यांची स्वच्छता करून नाले बंदिस्त करावेत. - जयंत म्हात्रे, रहिवासी, नेरु ळ