- नामदेव मोरे नवी मुंबई : एमआयडीसीमधील बोनसरीत झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर भंगार विक्रेत्यांनी गोडाऊन बंद करण्यास सुरुवात केली आहे. तीनही कंपनीमधील भंगार साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून येथे सुरू झालेले अवैध व्यवसाय व हॉटेलही बंद झाले आहेत.बोनसरीमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर अवैध भंगार विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार माफियांनी धुमाकूळ घातला आहे. बंद पडलेल्या कंपन्यांमधील भंगार साहित्य चोरून नेणाऱ्या व्यावसायिकांनी काही वर्षांपासून बंद कंपन्यांमध्ये भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. बोनसरीमधील डी १९ / २ या भूखंडावर पूर्वी तीन इमारतींचे बांधकाम करण्यात आले होेते. हा कारखाना बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी भंगार विक्रेत्यांनी अतिक्रमण केले. तीनही इमारतींचा व कंपनीच्या बाहेरील मोकळ्या जागेचा भंगार ठेवण्यासाठी वापर केला जावू लागला होता. रोडच्या समोर हॉटेल, पानटपरीही सुरू झाली होती. काही महिन्यांपासून याठिकाणी पत्ते खेळण्याचा क्लब अनधिकृतपणे सुरू झाला होता. जुगार खेळण्यासाठी येथे गर्दी होवू लागली होती. भंगारची गोडावून व जुगारांचा अड्डा यामुळे परिसरामध्ये चोरांचा वावरही वाढू लागला होता. परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रहिवाशांनी याविषयी वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु या तक्रारीकडे पोलीस, महापालिका व एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केले. वेळेत येथील अतिक्रमण हटविले असते तर तिहेरी हत्याकांड झालेच नसते अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.यापूर्वी भंगार विक्रेत्यांच्या भीतीने या कंपनीच्या आवारामध्ये जाण्याची सामान्य नागरिकांना भीती वाटत होती. विक्रेत्यांनी हा भूखंड स्वत:च्या मालकीचा असल्याप्रमाणे त्याचा वापर सुरू केला होता. तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रशासनाचे संबंधितांना अभय असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. तिहेरी हत्याकांडानंतर येथील तीनही भंगार दुकानदारांनी त्यांचा गाशा गुंडाळण्यास सुरवात केली आहे. कंपनीमधील भंगार साहित्य उचलण्यास सुरवात केली आहे. लवकरात लवकर कंपनी मोकळी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येथील अनधिकृत हॉटेलही बंद करण्यात आले आहे. जुगाराचा अड्डाही बंद झाला आहे. या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणारे भंगार गोडावून बंद होत असल्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. वास्तविक यापूर्वीच प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक होते अशी प्रतिक्रियाही रहिवाशांनी दिली आहे. अनधिकृत व्यवसायास पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.>बंद कंपन्यांचे सर्वेक्षण व्हावेऔद्योगिक वसाहतीमधील बंद कंपन्यांमध्ये अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून त्याचा भंगार व इतर व्यवसायासाठी वापर केला जात आहे. काही ठिकाणी अनधिकृत हॉटेल, खानावळही सुरू झाली आहे. एमआयडीसी, महापालिका व पोलीस प्रशासनाने सर्व बंद कंपन्यांचे सर्वेक्षण करून चुकीचा व्यवसाय होत असल्यास थांबवावा.>बंद कंपन्यांमध्येच अवैध मद्यसाठातुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील बंद कारखान्यांचा अवैध व्यवसायासाठी वापर होत आहे. मार्चमध्ये याच परिसरामध्ये ७३ लाख रुपयांचा व १० जुलैला १ कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा सापडला होता. मद्य विक्री करणाºयांनी बंद कंपन्यांचा गोडावून म्हणून वापर केल्याचे समोर आले होते. यामुळे प्रशासनाने बंद कंपन्यांमधील व्यवहारावर लक्ष ठेवावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
एमआयडीसीतील ‘ते’ भंगार गोडाऊन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:44 PM