एमआयडीसीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:43 AM2019-06-16T01:43:16+5:302019-06-16T01:43:29+5:30
आगीच्या घटना वाढल्या; तळोजातील कंपन्यांकडून अग्निशमन नियमांचे उल्लंघन
- वैभव गायकर
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. उद्योजकांकडून अग्निशमन नियमांना हरताळ फासला जात असून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भोपाळ सारखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भीषण आगीच्या घटनांनी हा परिसर हादरून जात आहे. काही महिन्यांपूर्वी रामके वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमधील स्फोट, मेसका कंपनीमधील आगीची घटना या अतिशय गंभीर आहेत. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमधील स्फोटाची तीव्रता अतिशय गंभीर होती. पनवेलसह कल्याण तालुक्यातील एकूण २५ गावांना याचा हादरा बसला होता. कॉग्निझंट या रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घटनेची गंभीरता लक्षात घेता, पुन्हा एकदा कंपनीचा हलगर्जीपणा येथील रहिवाशांच्या जीवावर बेतता बेतता राहिले. तळोजा एमआयडीसीमध्ये एकूण ३५० रासायनिक कारखाने आहेत. भविष्यात भोपाळसारखी घटना तळोजामध्ये घडण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात कंपन्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. कॉग्निझंट सारखी अतिशय ज्वालाग्राही रसायनाच्या कंपनीतही कोणतीही सुरक्षेची यंत्रणा राबविली जात नसेल तर येथील रहिवाशांची सुरक्षा खरोखरच राम भरोसे आहे. तळोजा एमआयडीसीलगत १५ गावांचा समावेश आहे. येथील प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांचे जीवन असह्य झाले आहे. प्रदूषणामुळे येथील पाण्याच्या स्रोतामधूनही दुर्गंधीयुक्त आणि रासायनिक मिश्रित पाणी येत आहे. तळोजा एमआयडीसीमधील वाढते प्रदूषण लक्षात घेता शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये धाव घेतली आहे.
प्रदूषण आणि दुसरीकडे सुरक्षा अशा द्विधा मनस्थितीत येथील रहिवासी जीवन व्यथित करीत असताना अशाप्रकारे घटनांवर लगाम घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. रामके कंपनीत झालेल्या स्फोटात शेकडो ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले होते. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या ग्रामस्थांना कोणतीच भरपाई देण्यात आली नाही. एवढी मोठी घटना घडूनदेखील अशाप्रकारे आगीचे प्रकार थांबले नाहीत. याकरिता एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा विभागाने स्वतंत्र मोहीम राबवून एमआयडीसीमधील सर्वच कंपन्यांच्या सुरक्षेचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे.
कंपनीमधील सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत असतो. कॉग्निझंट कंपनीच्या आगीची चौकशी सुरू आहे. यानंतर संबंधितावर खटला भरण्यात येईल. भविष्यात एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना घडणार नाहीत या दृष्टीने प्रत्येक कंपनीला सक्त ताकीद देणार आहोत. दोषी कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- एम. आर. पाटील, संचालक, औ. सुरक्षा, तळोजा एमआयडीसी
रामिक कंपनीतील स्फोटाने खऱ्या अर्थाने येथील सुरक्षेचे धिंडवडे निघाले होते. यांनतर दोन कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या तरीदेखील प्रशासनाचे डोळे उघडत नसतील तर तळोजामध्ये पुन्हा एकदा भोपाळ सारखी घटना घडण्यास वेळ लागणार नाही.
- हरेश केणी, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका
तळोजा एमआयडीसी विविध घटनाक्रम
२८ आॅक्टोबर २००६ : डार्फ कंपनीत भीषण आग
१८ जानेवारी २०११ : इंडियन आॅइल कंपनीत आग
३ फेब्रुवारी २०११ : ब्रुनेशा कंपनीत आग
८ एप्रिल २०१३ : चेसमिक कंपनीत आग
२१ मार्च २०१६ : टिकिटार कंपनीत भीषण आग (चार कामगार मृत्युमुखी)
३० नोव्हेंबर २०१६ : निडिलक्स कंपनीत आग (दोन कामगारांचा मृत्यू)
१९ डिसेंबर २०१६ : मेंबा केम कंपनीत आग
२८ आॅक्टोबर २०१८ : रामिक कंपनीत विस्फोट (एक जखमी) (२५ गावांना हादरा)
१७ डिसेंबर २०१८: मेसफार कंपनीत आग
१३ जून २०१९ : कॉग्निझंट कंपनीत आग