एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्री पालिकेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:19 AM2021-04-24T01:19:35+5:302021-04-24T01:20:02+5:30
१३९ जणांवर कारवाई : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान कारवाई केली. मास्कचा वापर न करणारे व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणारांकडून ६२ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाजार समितीमध्ये नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. मार्केटचे कामकाज मध्यरात्री सुरू होत असल्यामुळे त्याचवेळी विशेष पथकाने नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपाच्या पथकाने रात्री १२ ते शुक्रवारी पहाटे पाच दरम्यान ११५ व्यक्तींकडून मास्क न वापरल्याबद्दल ५७ हजार ५०० दंड वसूल केला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ व्यक्तींकडून ४ हजार ८०० दंड वसूल करण्यात आला. मनपाचे उपआयुक्त राजेश कानडे व तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व एपीएमसी मार्केट करीता नियुक्त विशेष दक्षता पथकांमधील ४८ कर्मचारी व १४ पोलीस कर्मचारी यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
कोपरखैरणेत दोन दुकानदारांवर कारवाई
कोपरखैरणे विभागात सहाय्यक आयुक्त अशोक मढवी आणि विभागातील कर्मचाऱ्यांनी ब्रेक द चेन आदेशानुसार सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक सेवेतील दुकाने कोविडच्या नियमांचे पालन करून सुरु असतील याकडे बारकाईने लक्ष दिले. यामध्ये सेक्टर १२ ई व सेक्टर ११ येथील २ दुकानांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी रुपये १० हजार याप्रमाणे एकूण रुपये २० हजार दंडाची रक्कम वसूल केली.