स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:43 AM2020-01-04T00:43:12+5:302020-01-04T00:43:15+5:30

पाण्याचा प्रश्न गंभीर; विमानतळबाधित गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा

Migrant school issues | स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर

स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोकडून दहा गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यासोबतच सात गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेचेही करंजाडे येथे सिडकोने स्थलांतर केले. एकाच इमारतीत ही शाळा भरते. सुरुवातीला शाळेला लागणाऱ्या सोयी सुविधा सिडकोकडून पुरवण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत सिडको व पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर बनले आहे.

पाण्याअभावी शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नियमित साफसफाईही होत नसल्याने ७०० विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी पालकांसह जनहित सामाजिक संस्थेने सिडको तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पासाठी सिडकोने पनवेल तालुक्यातील दहा गावांची जागा संपादित केली. ही गावे पुन:स्थापना केलेल्या जागेत स्थलांतर करण्यात आली. गावासोबतच येथील जि.प. शाळाही सिडकोने करंजाडे सेक्टर आर २ येथे तीन मजली इमारतीत केली. या इमारतीत चिंचपाडा, डुंगी, कोळी, मोठे ओवळे, वडघर, कोपर, वाघवली पाडा या सहा गावांतील शाळा एकत्रित भरवली जाते.

सुरुवातीला शाळेसाठी सिडकोकडून सोयी सुविधा पुरवण्यात आल्या; परंतु सद्यपरिस्थितीत शाळेची देखभाल दुरुस्ती, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट झाली आहे. येथील नळ तुटले आहेत. पाणी नसल्याने या ठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीची सफाई न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात अळ्यांची उत्पत्ती झाली आहे.
शाळेच्या इमारती परिसरात ठिकठिकाणी कचरा साठला आहे, तसेच बांधकामाचे साहित्यही अस्ताव्यस्त पडले आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या ७०० विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सिडकोने ही इमारत पनवेल पंचायत समितीकडे हस्तांतरित केली आहे. सोयी सुविधा व मेंटेनन्स करण्याकरिता सिडकोकडून दहा लाख रुपयाचे अनुदानही देण्यात आले आहे; परंतु याकडे सिडको तसेच पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिंचपाडा येथील जनहित सामाजिक संस्थेने केला आहे. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तक्रार करून शाळेतील गैरसोयी दूर करण्याची मागणी केली आहे.

तीन महिन्यांपासून सफाई कामगार नाही
शाळेतील साफसफाई करण्याकरिता कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार नसल्यानेही शाळा परिसर अस्वच्छ झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. लवकरच या ठिकाणी सफाई कामगार नेमावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.

लहान मुलांची तहान टँकरवर
सिडकोकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे; परंतु पाणी येत नसल्याने टँकर मागवून लहान मुलांची तहान भागवली जाते. लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार शिजवण्याकरिताही पाणी टँकरने मागवले जाते. टँकरने आणलेले पाणी फिल्टर असेलच असे नाही, यामुळे लहान मुलांना आजार जडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

शाळेच्या विविध समस्यांबाबत पालक तसेच सामाजिक संस्थेने कळवले आहे. मुख्यध्यापकांची तातडीने बैठक घेऊन या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व समस्यांचे निरसन केले जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- डी. एन तेटगुरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पनवेल

Web Title: Migrant school issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.