नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील गर्दी कमी न झाल्यास मार्केट तात्पुरत्या स्वरूपात खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिडकोने यासाठी जवळपास ५० एकर भूखंड उपलब्ध करून दिला असून १ हजार चौरस फुटाचे जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
मुंबई, नवी मुंबई परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजी मार्केटमधील होणारी गर्दी पहाता, कोरोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना कमी पडू लागल्या आहेत. पुढील दोन दिवसात गर्दी कमी न झाल्यास भाजी मार्केट खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, सिडको व बाजार समिती प्रशासनाला त्याविषयी सूचना केल्या आहेत. सिडकोने तत्काळ खारघर सेक्टर २८, २९ मधील भूखंड तात्पुरत्या स्वरूपात भाजी मार्केट स्थलांतर करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. भुखंडाची साफसफाई करून तेथे भाजी मार्केट उभारण्याचे काम सुरू आहे.
भाजी मार्केटमध्ये ९७६ गाळे असून विस्तारीत मार्केटमध्ये २८५ गाळे आहेत. हे गाळे २०० चौरस फूटाचे असून एकाला एक लागून आहेत. यामुळे मार्केट मध्ये प्रचंड गर्दी होत आहे. खारघरमध्ये मुळ मार्केटच्या पाच पट मोठ्या आकाराचे गाळे तयार केले जाणार आहेत.
एस टी डेपोच्या भूखंडाचा वापर
बाजार समितीच्या फळ मार्केटला लागून एस टी डेपोचा भूखंड मोकळा आहे. त्या भुंखंडाची ही साफसफाई करण्यात आली आहे. त्या भूखंडावर टोमॅटो व्यापाऱ्यांना स्थलांतर करण्याचा विचार सुरू आहे.